स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते : बापूसाहेब शिंदे-सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:30 AM2021-03-01T04:30:31+5:302021-03-01T04:30:31+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब बाळा शिंदे सरकार (माझे आजोबा) हे दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी अनंतात ...

Activists in the freedom struggle: Bapusaheb Shinde-Sarkar | स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते : बापूसाहेब शिंदे-सरकार

स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते : बापूसाहेब शिंदे-सरकार

googlenewsNext

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब बाळा शिंदे सरकार (माझे आजोबा) हे दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा अल्प परिचय देणारा हा लेख.

बापूसाहेब बाळा शिंदे (सरकार) यांचा जन्म कासेगाव (ता. वाळवा) येथे १६ जुलै १९२७ रोजी सामान्य कुटुंबात झाला. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने त्यांचे संगोपन आजी व वडिलांनी केले. लहानपणापासूनच त्यांना सार्वजनिक कामाची आवड होती. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या लढ्यात प्रति सरकारला सहाय्यभूत असणाऱ्या अनेक कामगिऱ्या त्यांनी पार पाडल्या. चळवळीसाठी बंदुका खरेदी करण्यास पैसे कमी पडले म्हणून पत्नीचे मंगळसूत्र विकले. ग्राम स्वच्छता मोहीम, अस्पृश्यता निवारण्यासाठी सहभोजन कार्यक्रम आयोजित केले. १९४९ मध्ये साने गुरुजी, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, ना. ग. गोरे आदी समाजवादी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कासेगावला समाजवादी युवक परिषद यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तिसंग्राममध्ये झोकून देऊन काम केले. अन्नधान्य टंचाईच्या प्रश्नासाठी, गायरान जमिनी भूमिहीनांना मिळण्यासाठी आंदोलन, उपासमार विरोधी कृती समिती आंदोलन, असे अनेक लढे, सत्याग्रह, मोर्चे काढले. प्रसंगी अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. वेगवेगळ्या पक्षांच्या, विविध विचारसरणीच्या नेत्यांशी जरी सरकारांचा संबंध आला असला तरी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सन १९७८ पर्यंत समाजवादी पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केले असल्याने त्यांना तालुका व जिल्ह्यातील जुने सहकारी ‘कॉम्रेड’ म्हणूनच हाक मारत असत. त्यांचे विचार हे पुरोगामी विचारसरणीचा पाठपुरावा करणारेच होते.

सरकारांचा लोकसंपर्क दांडगा होता. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, पांडू मास्तर, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांती विरांगना इंदूताई पाटणकर, स्वातंत्र्यसैनिक शेख काका अशा अनेक क्रांतिवीरांशी त्यांचा संबंध आला.

सन १९५५ ते १९६५ च्या दरम्यान प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, भूमिहीनांचे लढे तसेच विविध निवडणुकांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने सरकारांच्या घरी आले होते. महाराष्ट्राचे थोर विचारवंत माजी सहकारमंत्री डॉ. एन. डी. पाटील यांचे सहकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. राजकारणाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, काँग्रेस नेते गुलाबराव पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, लोकनेते राजारामबापू पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेपासून यशवंतराव मोहिते, माजी चेअरमन जयवंतराव भोसले आदी नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

विविध पदाधिकारी म्हणून काम करत असताना कासेगाव ग्रामपंचायतीचे ते वेळोवेळी २५ वर्षे सदस्य राहिले. पश्चिम भाग सेवा सोसायटीचे संचालक व अध्यक्ष सहकार तदर्थ समिती (केडर) वाळवाचे सदस्य, सोमेश्वर पाणी पुरवठा संस्थेचे संचालक व चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले, तसेच कासेगाव येथील इंदिरा नागरी पतसंस्था, संजीवनी दूध संस्था, क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळ या संस्थांच्या उभारणीमध्ये पुढाकार घेतला.

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. शिवाजीराव नाईक साहेब यांचे ते १९८४ पासून चे विश्वासू सहकारी होते. नाईक साहेबांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक व काही काळ व्हॉइस चेअरमन म्हणूनसुद्धा त्यांनी काम केले.

स्वातंत्र्यानंतर कासेगावमधील शेकडो स्थानिक कौटुंबिक वाद-विवाद तडजोड व चर्चेने मिटविण्यामध्ये बाबांचा हातखंडा होता. त्यांच्या हातात न्यायाचा तराजू दिला तर न्याय निश्चित होणार असा सर्वसामान्य माणसांचा विश्वास होता. म्हणूनच लोकांनी त्यांना प्रेमाखातर ‘सरकार’ म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यांनी स्वत:च्या कर्माने लोकांच्या हृदयात जागा मिळवली आणि ‘सरकार’ हे नाव सार्थ ठरविले.

२००१ साली त्यांचे हितचिंतक, नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रमंडळी यांनी बाबांचा ‘अमृतमहोत्सव’ साजरा केला. त्याप्रसंगी खेळाचे सामने, अभ्यास शिबिर व जाहीर सत्कार सोहळा आयोजित करून त्यांच्या कार्याची लिखित स्वरूपात ओळख व्हावी म्हणून ‘कार्यकर्ता’ ही स्मरणिका काढली आणि हा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, नवेगाव आंदोलनाचे प्रणेते प्रा. डॉ. पी. बी. पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, समाजवादी प्रबोधिनीचे आचार्य शांताराम गरुड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. बी. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

२०११ साली बाबांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्नेहमेळावा’ आयोजित करून त्यांची नात प्रेरणा योगेश देशमुख हिने लिहिलेले सरकारांच्या जीवनावरील ‘परीसस्पर्श’ हे पुस्तक प्रकाशित करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. तो माझ्या जीवनातील भाग्यशाली दिवस होता.

समाजकारणात, राजकारणात सरकारांसारखा सेवाभावी, स्वच्छ चारित्र्याचा, पारदर्शक व्यवहाराचा, निष्ठावान, घट्ट जिद्दीचा, धडाडीचा, मोकळ्या मनाचा, कार्यकर्ता मिळणे दुरापास्त आहे.

आज सरकारांच्या निधनाने आम्हा कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही; परंतु त्यांनी आयुष्यभर दिलेले संस्कार, आचार- विचार आमच्या आयुष्यामध्ये अंगीकारण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या आदर्श अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम.

-श्री. प्रशांत तुकाराम कदम (सर)

सरकारांचा नातू, कासेगाव

-शब्दांकन- प्रताप बडेकर, कासेगाव

Web Title: Activists in the freedom struggle: Bapusaheb Shinde-Sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.