स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, सांगलीतील इस्लामपुरात ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली
By श्रीनिवास नागे | Published: November 17, 2022 01:37 PM2022-11-17T13:37:11+5:302022-11-17T13:43:21+5:30
आवाहन करुनही आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले
सांगली : या हंगामात उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशी हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली. इस्लामपूर-वाळवा रस्त्यावर बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडली तर बावची फाट्यावर राजारामबापूकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पोलिसांसमक्ष परत पाठवले.
उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानीने आज आणि उद्या दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्यापूर्वी वाळवा-शिराळा तालुक्यातील सर्व कारखान्याच्या व्यवस्थापनाना निवेदन देऊन आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. मात्र तरीसुद्धा आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
हुतात्मा कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या रोखून कार्यकर्त्यांनी चाकातील हवा सोडून ही वाहतूक रोखली. त्यानंतर बावची फाट्यावरून राजारामबापू कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेले ट्रॅक्टर रोखून पोलिसांदेखत त्यांना परत फडात जाण्याची विनंती करत ही ऊस वाहतुकसुद्धा रोखली. आता जिथे ऊसतोड सुरू आहे ती बंद पाडण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने फडात घुसणार आहेत. त्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे हे ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.