सांगली जिल्ह्यात म्हैशी चोरणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:04 PM2018-07-04T23:04:23+5:302018-07-04T23:04:29+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात म्हैशी चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या टोळीने धुमाकूळ घातला आहे. दिवसभरात टेहळणी करायची आणि रात्रीच्यावेळी मोठ्या वाहनातून येऊन, गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हैशी लंपास करण्याचा प्रकार घडत आहे. टोळीने आतापर्यंत २४ म्हैशी लंपास केल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. पण म्हैशी चोरण्याचे प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मिरज, खानापूर, शिराळा, वाळवा या तालुक्यात टोळीने धुमाकूळ घातला आहे. चार ते पाच जणांची ही टोळी असावी, असा संशय आहे. दिवसभरात फिरुन ते विरळ वस्तीमध्ये कोठे जनावरांचा गोठा आहे का, तिथे म्हैशी आहेत का, त्या म्हैशी गाभण आहेत का, याची टेहळणी करतात. त्यानंतर मध्यरात्री ते मोठ्या वाहनातून तेथे येतात आणि गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हैशी सहजपणे लंपास करतात. दुसºयादिवशी गोठ्याचा मालक आल्यानंतर हा प्रकार उघडकीस येतो. सध्या एक म्हैस साधारपणे ४० हजार रुपये किमतीची आहे. गेल्या दोन महिन्यात टोळीने अंदाजे २२ म्हैशी लंपास केल्या आहेत. त्यांची किंमत साडेआठ लाखाच्या घरात जाते.
सहा महिन्यांपूर्वी शेळ्या व बोकड चोरणाºया टोळीने धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी या टोळीतील दोघांना पकडल्यानंतर या गुन्ह्यांना आळा बसला. पण त्यानंतर आता म्हैस चोरीच्या गुन्ह्यांची मालिकाच सुरु आहे. ग्रामीण भागात आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. अनेक कुटुंबांचे म्हैस पाळणे हेच उपजीविकेचे साधन आहे. एका रात्रीत उदरनिर्वाहाचे साधन असलेली म्हैस लंपास होत असल्याने पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कर्नाकर्नाटकात विक्री
चोरलेल्या म्हैशींची सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील मोठ्या जनावरांच्या बाजारात विक्री केली जात आहे. या म्हैशी चोरलेल्या आहेत, याबद्दल कोणाला शंका येऊ नये, यासाठी या टोळीकडून म्हैशींची शिंगे रंगविली जातात, तसेच ती तासतात. त्यानंतर त्या शिंगांना दुसरा रंग देतात. याशिवाय कतलीसाठीही ते म्हैशींची विक्री करीत असल्याचा संशय आहे. म्हैशीबरोबर रेडकांचीही चोरी केली जात आहे.
स्वभावामुळे म्हैशींवरच डोळा...
म्हैशी बुजत नाहीत. त्या मारतही नसल्याने त्यांची चोरी सहजपणे करता येते. तसेच त्या नवीन जागेत लगेच रुळतात. सध्या म्हैशींचे दर वाढले असून, दुधालाही दर चांगला आहे. त्यामुळे ही टोळी म्हैशींचीच चोरी करीत आहे.