सांगलीतील उपक्रम : लग्नातील आहेराने अनाथालयात बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 04:03 PM2019-06-24T16:03:42+5:302019-06-24T16:06:13+5:30
कोमेजणाऱ्या फुलांचा गुच्छ अल्पावधित कचऱ्याच्या कोंडाळ्यळत जातो. त्याच्या खरेदीसाठी घातलेले हजारो रुपयेसुद्धा कचऱ्याच्या ढीगात भर घालतात. दुसरीकडे थोड्याशा आर्थिक मदतीसाठी अनाथ मुले, महिला व त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था धडपडत असतात. समाजातील हा विरोधाभास दूर करीत सांगलीतील एका जोडप्याने रोख स्वरुपात आहेर मागितला आणि आलेल्या आहेरातून अनाथालयातील मुलांच्या चेहऱ्यावर फुलांपेक्षाही सुंदर बहर फुलविला.
सांगली : कोमेजणाऱ्या फुलांचा गुच्छ अल्पावधित कचऱ्याच्या कोंडाळ्यळत जातो. त्याच्या खरेदीसाठी घातलेले हजारो रुपयेसुद्धा कचऱ्याच्या ढीगात भर घालतात. दुसरीकडे थोड्याशा आर्थिक मदतीसाठी अनाथ मुले, महिला व त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था धडपडत असतात. समाजातील हा विरोधाभास दूर करीत सांगलीतील एका जोडप्याने रोख स्वरुपात आहेर मागितला आणि आलेल्या आहेरातून अनाथालयातील मुलांच्या चेहऱ्यावर फुलांपेक्षाही सुंदर बहर फुलविला.
सांगलीतील प्रशांत कुलकर्णी व पुण्यातील गौरी नाईक या दोघांचा विवाह व स्वागत सोहळा या अनोख्या उपक्रमांनी चर्चेत आला. जाहिरात व इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशांत कुलकर्णी यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे. त्यामुळे आवडीला कृतीत उतरविण्यासाठी त्यांनी आपल्याच लग्नाचा मुहूर्त साधला. अर्धांगीनी म्हणून आयुष्यात आलेल्या गौरी यांनाही हा उपक्रम भावला आणि त्यांनी लगेच त्यांच्या या इच्छेला आपल्या संमतीचे बळ दिले.
कृपया आहेर आणू नये, किंवा आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर, अशा स्वरुपाच्या वाक्यांची सवय झालेल्या लोकांच्या हाती सुखद धक्का देणारी पत्रिका आली. कृपया रोख स्वरुपात जास्तीत जास्त आहेर आणावा, जमा झालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल, असा यावर ठळक संदेश देण्यात आला. पुष्पगुच्छ आणून कचऱ्याची भर करण्यापेक्षा सामाजिक कार्यात सर्वांचा हातभार लागावा, हा दृष्टीकोन फलदायी ठरला.
दोघांचे लग्न पुण्यात आणि स्वागत समारंभ सांगलीत झाला. या दोन्ही समारंभात रोख आहेर जमा करण्यासाठी दोन बॉक्स ठेवण्यात आले होते. आहेर घेऊन येणाऱ्यांना त्या बॉक्समध्ये टाकण्याच्या सुचना दिल्या जात होत्या. लोकांनी भरभरून मदत दिली. लग्नसमारंभात जमा झालेले २२ हजार रुपये पुण्यातील दिशा या महिला व मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सामाजिक संस्थेस आणि स्वागत समारंभातीलही मोठी रक्कम मिरजेतील माहेर या अनाथ महिला व मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात आली.
स्वागत समारंभातील स्नेहभोजनाची सुरुवातही अनाथालयातील मुलांच्या पंगतीने करण्यात आली. अनाथ मुलांनी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पाहुण्यांना पंगतीला निमंत्रित करण्यात आले.
प्रत्येक लग्नात हे घडावे!
प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, आम्ही सुरुवात केली आहे. दररोज राज्यात, देशात हजारो लग्नसमारंभ होत असतात. अशा बहुतांश लग्नात सामाजिक कार्यासाठी रकमा गोळा केल्या तर किती अनाथ मुले व महिलांना त्यापासून मदत मिळू शकते. पुष्पगुच्छ हाती येताच कचºयाच्या कोंडाळ््याच्या दिशेने वाटचाल करतात. त्यामुळे अशा गोष्टींवरचा खर्च प्रत्येकाने टाळावा.