सांगलीत हॉटेल व्यावसायिकाचा मेहुण्यांकडून खून, कौटुंबिक कारणातून कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 07:39 PM2019-06-19T19:39:58+5:302019-06-19T20:09:36+5:30
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकीजा मशिदीमागे हॉटेल व्यावसायिकाचा दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. जमीर रफिक पठाण (वय ५५, रा. पेण, पनवेल) असे मृताचे नाव आहे.
सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकीजा मशिदीमागे हॉटेल व्यावसायिकाचा दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. जमीर रफिक पठाण (वय ५५, रा. पेण, पनवेल) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खूनप्रकरणी जमीर यांच्या दोन मेहुण्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरारी आहेत. कौटुंबिक कारणावरून हा खून झाल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.
आलीम सलीम पठाण (३०) व शाहरुख सलीम पठाण (२७, रा. पाकीजा मशिदीमागे, अल्अमीन शाळेजवळ, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. मृत जमीर यांचा मुलगा युसूफ पठाण याने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जमीर यांचा पेण येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. ते कुटुंबासह पनवेलला राहत होते. पंधरा दिवसांपूर्वी ते मेहुणीच्या लग्नासाठी कुटुंबासह सांगलीत आले होते. संशयित आलीम व शाहरुख यांच्या घराशेजारीच ते राहत होते. आलीम रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मिरजेतील एका कॅरम क्लबमध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता. त्यात त्याला अटकही झाली होती. तो कारागृहात असताना त्याच्या मुलाचा सांभाळ बहिणीने म्हणजे मृत जमीर यांच्या पत्नीने केला होता. या खुनातून तो निर्दोष सुटला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचा मुलगा आलीमजवळ जात नव्हता. तो आलीमच्या बहिणीकडेच राहत होता. याचा त्याला राग होता. मुलगा आपल्याकडे का येत नाही, यातून त्याचा बहिणीशी यापूर्वीही वरचेवर वाद झाला होता.
मंगळवारी रात्री एकच्या सुमारास याच कारणावरून त्याचा जमीर यांच्याशी वाद झाला. जमीर यांनी त्याला ‘रात्री कशाला वाद घातलोत, सकाळी बघू’ असे समजावूनही सांगितले. पण हा वाद वाढत गेला. इतर नातेवाईकांनी हा वाद थांबविण्याचाही प्रयत्न केला. यावेळी संशयित आलीमचा भाऊ शाहरूखही तिथे होता. आलीम याने चाकूने जमीर यांच्यावर हल्ला केला.
जमीर यांचा मुलगा युसूफ याने आलीमला अडविण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार जमीर यांच्या छातीवर बसला. ते जमिनीवर कोसळले. नातेवाईकांनी त्यांना मोटारसायकलवरून सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचार सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास जमीर यांचे निधन झाले. हल्ल्यानंतर हल्लेखोर आलीम व त्याचा भाऊ शाहरुख या दोघांनी पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनीही पाहणी केली. बुधवारी सकाळी जमीर यांचा मुलगा युसूफ याने सांगली शहर पोलीस ठाण्यात आलीम व शाहरुख पठाण या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मदतगाराचाच खून
मुख्य संशयित आलीम पठाण याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात काही वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्याला अटक झाली होती. तो कारागृहात असताना जमीर पठाण यांनी त्याला सर्व ती मदत केली होती. कारागृहातही ते त्याला मनीआॅर्डरद्वारे पैसे पाठवित होते. खुनाच्या गुन्'ातून निर्दोष सुटल्यानंतरही जमीर यांनी आलीम याला हॉटेलमध्ये काम दिले होते. मात्र आलीमने मदतीला धावणाऱ्या जमीर यांचा खून केला. याची चर्चा पाकीजा मशीद परिसरात सुरू होती.
तीन पथके रवाना
खुनानंतर संशयित आलीम व शाहरुख पठाण या दोघांनी पलायन केले. या दोघांच्या शोधासाठी सांगली शहर पोलिसांची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. एक पथक कर्नाटकातही पाठविण्यात आले आहे, तर इतर दोन पथके सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्'ात संशयितांचा शोध घेत असल्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.