गौतमी पाटीलची लावणी म्हणजे..., प्रिया बेर्डेंनी स्पष्टच व्यक्त केलं मत
By अविनाश कोळी | Published: April 8, 2023 06:44 PM2023-04-08T18:44:00+5:302023-04-08T18:44:37+5:30
राष्ट्रवादीतून भाजप पक्षप्रवेशाबाबत म्हणाल्या..
सांगली : लावणी हा सुंदर कलाप्रकार असला तरी गौतमी पाटीलसारख्या कलाकारांच्या लावणीला कला म्हणताच येणार नाही. रसिकांनी अशा उथळपणाकडे दुर्लक्ष करायला हवे, असे मत भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की, गौतमी पाटील यांच्यासारख्या कलाकारांना अकारण मोठे केले जात आहे. रसिक जोपर्यंत असे प्रकार दुर्लक्षित करणार नाहीत तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील. कलेच्या नावावर काहीही खपविण्यात येते. पारंपरिक लावणी व नृत्य अत्यंत सुंदर आहे. त्यातील अस्सलपणा हरविला जाऊ नये, तो टिकविण्याचे काम रसिकांनीच केले पाहिजे.
त्या म्हणाल्या की, कला क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आमची आघाडी प्रयत्नशील आहे. राज्यात, देशात व देशाबाहेरही कला उत्सव घेऊन कलाकारांना बळ देण्याचा विचार आहे. कलाकारांचे मानधन अजून वाढविण्याबाबत आमचे प्रयत्न राहतील. शासनाकडे अशा बऱ्याच योजना आम्ही घेऊन जाणार आहोत.
राजाश्रयामुळेच देशातील कलांना बहर आला होता. आता शासनाकडून त्या अपेक्षा असणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री तसेच भाजपचे वरिष्ठ नेते कलाक्षेत्राबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रश्न साेडविले जातील, याची खात्री वाटते.
पक्षबदलामागे राजकारण नाही
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भाजपकडून कलाकारांचे प्रश्न सोडविले जातील, याची खात्री वाटली म्हणूनच पक्षप्रवेश केला, असे बेर्डे म्हणाल्या.