आदर्श तलाठी दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
By घनशाम नवाथे | Published: June 20, 2024 09:51 PM2024-06-20T21:51:07+5:302024-06-20T21:51:15+5:30
तडसर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : शेतजमिनीची साताबारावर नोंद करून उतारा देण्यासाठी दहा हजार रूपये लाच घेताना तडसर (ता. कडेगाव) येथील तलाठी वैभव सुभाष तारळेकर (वय ४५, रा. कृष्णा अपार्टमेंट, कडेगाव, मूळ रा. सरस्वतीनगर, वासुंबे, ता. तासगाव) याला शुक्रवारी अटक करण्यात आली. तारळेकर याला महिन्यापूर्वीच आदर्श तलाठी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याहस्ते गौरवले होते.
अधिक माहिती अशी, तडसर परिसरातील तक्रारदार आणि त्यांचा पुतण्या यांनी एकमेकास विक्री केलेल्या शेतजमिनीची सात बारावर नोंद करून उतारा देण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. सातबारावर नोंद आणि उतारा देण्यासाठी तलाठी तारळेकर याने दहा हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पडताळणी केली. त्यामध्ये तारळेकर याने शेतजमिनीची सात बारावर नोंद करण्यासाठी व उतारा देण्यासाठी दहा हजाराची लाच मागितल्याचे निष्प्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ कडेगाव-तडसर रस्त्यावरील कृष्णा अपार्टमेंटजवळ सापळा रचला. त्यानंतर तारळेकर याला दहा हजार रूपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाचेच्या कारवाईनंतर कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी त्याला विटा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, वंटमुरे यांच्या पथकाने कारवाई केली.
तालुक्यात खळबळ
लाचखोर वैभव तारळेकर याला आदर्श तलाठी म्हणून नुकतेच गौरवले होते. तसेच तो तलाठी संघटनेचा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होता. त्याला जाळ्यात पकडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.