आदर्श विद्यालयाने रचला गुणवत्तेचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:00+5:302021-07-18T04:20:00+5:30
विटा : येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या भवानीनगर (विटा) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात सलग वीस वर्षांपासून ...
विटा : येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या भवानीनगर (विटा) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात सलग वीस वर्षांपासून एस.एस.सी. बोर्डाचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा या विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा इतिहास रचला असल्याचे गौरवोद्गार माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी काढले.
विटा येथील आदर्श माध्यमिक विद्यामंदिराचा यावर्षीचाही दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी आ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, मुख्याध्यापक सुभाष धनवडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावाशेजारीच शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भवानीनगर येथे आदर्श माध्यमिक विद्यामंदिर सुरू करण्यात आले. या विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता कायम राखली आहे.
मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी यावर्षी दहावीत आदर्श माध्यमिक विद्यामंदिरच्या ६१ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, तर ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले असून, १३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी ऐश्वर्या गडदरे, दुर्गा कांबळे व वर्षाराणी संजय सुतार या अनुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थिनींचा सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फोटो - १७०७२०२१-विटा-आदर्श : विटा येथील आदर्श माध्यमिक विद्यामंदिरच्या दहावी परीक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, मुख्याध्यापक सुभाष धनवडे उपस्थित होते.