म्हमद्याचा बुरखा घालून पोलिसांना चकवा
By Admin | Published: November 15, 2015 01:10 AM2015-11-15T01:10:57+5:302015-11-15T01:11:49+5:30
शंभर फुटांवर पोलीस असूनही आईला भेटला
सांगली : येथील अभयनगरमधील गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याच्या खुनातील मुख्य संशयित गुंड म्हमद्या नदाफ याने गुरुवारी रात्री पुन्हा एकदा पोलिसांना चकवा दिला. माने व म्हमद्या यांच्या घरामध्ये केवळ शंभर फुटांचे अंतर आहे. खून झाल्यापासून मनोजच्या घराजवळ शस्त्रधारी दहा पोलिसांचा कडा पहारा सुरू आहे. असे असताना म्हमद्याने बुरखा घालून आईची भेट घेतली. पत्नी दिलशाद हिला पोलिसांनी सोडले की नाही, याची चौकशी करून रात्री बारा वाजता तो घरातून निघून गेला. त्याच्या या ‘धाडसा’मुळे पोलिसांचे नाक कापले गेले आहे.
आर्थिक वाद, खंडणीची तक्रार या कारणावरून म्हमद्या व त्याच्या साथीदारांनी सोमवारी (दि. ९) रात्री मनोजचे अपहरण करून खून केला होता. याप्रकरणी आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे. यामध्ये म्हमद्याच्या पत्नीचाही समावेश आहे. म्हमद्याच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यांना अद्याप यश आलेले नाही. मनोजचा खून झाल्यापासून त्याच्या कुटुंबास पोलीस संरक्षण दिले आहे. एक पोलीस उपअधीक्षक व नऊ कर्मचारी शस्त्रधारी ताफा मनोजच्या घराबाहेर थांबून आहे. मनोजच्या घरापासून शंभर फूट अंतरावर म्हमद्याचे घर आहे. त्याच्या घरात सध्या केवळ त्याची आई आहे. त्याचा भाऊ शंभरफुटी रस्त्यावर राहतो. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता म्हमद्या बुरखा घालून स्वत:च्या घरी गेला. त्याने दरवाजा आतून बंद करून घेतला. घरी तो अर्धा तास होता. त्याने पत्नी दिलशादबाबत चौकशी केली. तिला अटक केल्याचे समजल्यानंतर म्हमद्या बुरखा घालूनच घरातून बाहेर पडला. पोलिसांना त्याच्याबद्दल जराही संशय आला नाही.
म्हमद्या बुरखा घालून आईला भेटून गेल्याचे समजताच पोलिसांना धक्का बसला. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने संपूर्ण शहरात नाकाबंदी व ‘कोम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविली. धार्मिक स्थळांची तपासणी केली. पहाटे चारपर्यंत म्हमद्याचा शोध सुरू होता. मानेच्या घराजवळ बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फैलावर घेतले. म्हमद्या पुन्हा येऊ शकतो, असा अंदाज बांधून आता म्हमद्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गल्ली-बोळांत पोलीस नियुक्त केले आहेत. त्याच्या घरावर व तसेच आईवरही ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आई ताब्यात
पोलिसांनी म्हमद्याच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिनेही म्हमद्या बुरखा घालून भेटायला आला होता, त्याने पत्नीची चौकशी केली, असे सांगितले. म्हमद्या कोठे आश्रयाला जाऊ शकतो, याबद्दल पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली. तथापि चौकशीला तिने फारसा प्रतिसाद दिला नाही.
पोलिसांना महागात पडले
मनोजचा मित्र भरत फोंडे याने म्हमद्या व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मनोजला सरकारी साक्षीदार केले होते. म्हमद्याच्या तीन साथीदारांना तातडीने अटक केली. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तो शहरात खुलेआम फिरत होता, अशी चर्चा आता रंगली आहे. या काळात त्याने मनोजच्या खुनाचा कट रचला. पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली असती, तर मनोजचा प्राण वाचला असता. खुनानंतर पोलीस आता त्याच्या शोधासाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. खंडणीचे हे प्रकरण पोलिसांना चांगलेच महागात पडल्याचे दिसू लागले आहे.