सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

By अशोक डोंबाळे | Published: September 1, 2023 05:02 PM2023-09-01T17:02:29+5:302023-09-01T17:04:13+5:30

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे.

Add to the symbolic statue of Mahavitran killed by farmers in Sangli | सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

googlenewsNext

सांगली : शेतीला अखंडित सहा तासही वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून अधिकाऱ्यांचा निषेध केला. तसेच अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मागणीपेक्षा कमी वीज घेऊन शेतकऱ्यांवर जादाचे भारनियमन लादले जात आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले की, पाटबंधारे विभागाने उपसाबंदी जाहीर केल्यामुळे कृषी पंपांची वीज बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरसा पाऊस न झाल्यामुळे सध्या पिके वाळू लागली आहेत. शेतीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पाटबंधारे विभागाने कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आपल्या विभागाकडून वारंवार शेतीपंपाची वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान झालेले आहे.

काही भागामध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. राज्यात सरासरी २५ हजार मेगावॅटची गरज आहे. सध्या २७ हजार मेगावॅटपर्यंत मागणी वाढली आहे. दोन हजार मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी भारनियमन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मार आंदोलन केले. यावेळी रमेश शेडेकर, बाळासाहेब पाटील, वसंत हौन्जे, डिसले गुरुजी, आबा आवटी, रावसाहेब पाटील, कुमार मगदूम, सुहास गाडवे आदी उपस्थित होते.

शेतीला अखंडित आठ तास वीज द्या

शेतीपंपांना अखंडित आठ तास विजेचा पुरवठा मिळाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीपंपाला जादा भारनियमन करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला.

Web Title: Add to the symbolic statue of Mahavitran killed by farmers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली