पंचतत्त्वांना आध्यात्मिक अधिष्ठान आणि विज्ञानाची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:33+5:302021-01-25T04:26:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांना आध्यात्मिक अधिष्ठान तर आहेच, पण विज्ञानाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांना आध्यात्मिक अधिष्ठान तर आहेच, पण विज्ञानाची जोडही आहे. पंचमहातत्त्वांचे महत्त्व आणि माहात्म्य समजण्यासाठी त्यांचा शास्त्रीय अभ्यास गरजेचा असल्याचा सूर सांगलीतील पहिल्या पंचतत्त्व साहित्य संमेलनात उमटला.
श्री महाराज पंचतत्त्व सेवा प्रतिष्ठानने संमेलनाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रा. भरतेश्वर पाटील होते. त्यांनी पौराणिक दाखले देत पंचतत्त्वांच्या अभ्यासाबाबत प्रबोधनाची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, ग्रामीण लोकांना पंचतत्त्वांची माहिती पूर्वीपासूनच आहे. त्यामुळेच तेथे त्यांचे संरक्षण झाले आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पंचमहातत्त्वांचा अभ्यास होऊन त्यांचा व्यक्ती आणि समाजकल्यासाठी कसा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलांना शालेय वयापासूनच शिक्षण दिले पाहिजे.
यावेळी रंगकर्मी संपत कदम यांना आकाशदेवता रंगभूमी पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मुळे यांना अग्निदेवता समाजसेवा पुरस्कार, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांना वायूदेवता आरोग्यसेवा पुरस्कार, लेखक सचिन पाटील यांना जलदेवता साहित्य सेवा पुरस्कार आणि ‘ॲनिमल राहत’चे कार्यकर्ते कौस्तुभ पोळ यांना पृथ्वीदेवता वसुंधरा सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
संमेलनास अॅड. शाम जाधव, विजय कडणे, मुकुंद पटवर्धन, कुलदीप देवकुळे, शाम गुरव, विजय कोगनोळे, सरिता माने, सुप्रिया खरे, राजेंद्र जोशी, मुस्तफा मुजावर, सुहास पाटील, तात्या कोरे आदी उपस्थित होते. प्रतीक साठे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
रंगले कविसंमेलन
संमेलनात दयासागर बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. अभिजित पाटील, वर्षा चौगुले, गौतम कांबळे, दीपाली घागरे, मधुरा डिग्रजकर, मुबारक उमराणी यांनी कविता सादर केल्या.
---------------