विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएमसाठी अतिरिक्त 'सीईटी' होणार
By संतोष भिसे | Published: June 21, 2024 06:29 PM2024-06-21T18:29:04+5:302024-06-21T18:29:43+5:30
यापूर्वी सीईटी झालेल्यांचे काय?
सांगली : बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या शिक्षणक्रमांसाठी आणखी एक अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी पालकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे. आता प्रत्यक्ष सीईटीकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
या शिक्षणक्रमांसाठी यंदा प्रथमच सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती, पण तिच्या पुरेशा माहितीअभावी लाखो बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. परीक्षा आणखी एकदा घेण्याची मागणी राज्यभरातून होती. अनेक महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण परिषदेला व सीईटी सेलला त्यासाठी पत्रे दिली होती. काही संस्था सर्वोच्च न्यायालयातही गेल्या होत्या. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. त्यानुसार हे शिक्षणक्रम तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आपल्या अखत्यारीत घेतले आहेत. यापूर्वी ते विद्यापीठ स्तरावर चालायचे. तंत्रशिक्षण परिषदेेकडे शिक्षणक्रम गेल्याने प्रवेशासाठी सीईटी लागू झाली. यंदा प्रथमच सीईटी झाली; पण माहितीअभावी लाखो विद्यार्थी वंचित राहिले.
यापूर्वी सीईटी झालेल्यांचे काय?
या चारही शिक्षणक्रमांसाठी यापूर्वी सीईटी झाली आहे. तिचा निकालही लागला आहे. त्यातून गुणवत्ता यादी तयार होणे अपेक्षित आहे. पण सीईटी सेलने आता आणखी एक सीईटी जाहीर केल्याने जुन्या परीक्षार्थींच्या गुणवत्तेचे काय? असा प्रश्न पुढे आला आहे. नव्या परीक्षार्थींना सीईटीतील प्रश्नांचा अंदाज आल्याने त्याच्या आधारे ते जास्त गुण मिळवू शकतात. त्यामुळे जुन्या परीक्षार्थींवर नैसर्गिक अन्याय होणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
विद्यार्थ्यांनो, संकेतस्थळावर लक्ष ठेवा
सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रकाशित होणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसाठीची नोंदणीही येथेच करता येईल. प्रसंगी महाविद्यालयांशीही संपर्क साधता येईल.
आणखी एक सीईटी होणार असल्याचे सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्याचे वेळापत्रक मात्र मिळालेले नाही. ते जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. अतिरिक्त सीईटीमुळे वंचित विद्यार्थ्यांना या शिक्षणक्रमांना प्रवेश मिळविण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. - डॉ. श्वेता मेहता, संचालिका, चिंतामणराव इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, सांगली