मिरज महापालिका कार्यालयाचा पदभार अतिरिक्त आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:36+5:302021-07-10T04:18:36+5:30
सांगली : महापालिकेच्या मिरज व कुपवाड विभागीय कार्यालयांचा पदभार अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश ...
सांगली : महापालिकेच्या मिरज व कुपवाड विभागीय कार्यालयांचा पदभार अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी दिला. मिरज विभागीय कार्यालयातील उपायुक्त, खातेप्रमुखांच्या कारभाराला चाप लावण्यासाठीच आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
महापालिकेला तब्बल दहा वर्षांनंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून लांघी रूजू झाले. त्यांच्याकडे कोणत्या विभागाचा कार्यभार सोपवणार, याची उत्सुकता होती. त्यात मिरज विभागीय कार्यालयांतर्गत मिरज व कुपवाड या दोन शहरांच्या कारभाराबाबत नागरिक, सामाजिक संघटनांच्या अनेक तक्रारी येत होत्या. मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांचा कार्यकालही पूर्ण होत आला आहे. कुपवाडमधील कामाबाबत अनेक तक्रारी होत्या. खातेप्रमुखांसह काही अधिकाऱ्यांची या विभागात मनमानी सुरू होती. आता लांघी यांच्याकडे मिरज विभागीय कार्यालयाचा पदभार सोपवून आयुक्तांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.
आयुक्त कापडणीस यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले. मिरज व कुपवाड विभागातील सर्वच खातेप्रमुख, विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांनी कामकाजाच्या फायली अतिरिक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांकडे सादर कराव्यात. त्यात कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी खातेप्रमुख, उपायुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांवरही राहील, असेही आदेशात म्हटले आहे.