अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:29+5:302021-06-24T04:19:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. तब्बल अकरा वर्षांनंतर या पदावर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी दाखल झाल्याने त्यांच्यासाठी कार्यालय व निवासस्थानाची शोधाशोध सुरू झाली आहे.
दत्तात्रय लांघी हे अहमदनगर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची नुकतीच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. लांघी यांनी मुख्याधिकारी, तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी बुधवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. महापालिका क्षेत्रात माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मनोदय लांघी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अकरा वर्षे या पदावर कोणाचीच नेमणूक न झाल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था नाही. अतिरिक्त आयुक्तांचे पूर्वीचे कार्यालय गेल्या कित्येक वर्षांपासून गटनेत्यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र निवासाचीही व्यवस्था नाही. महापालिकेच्या शाळा नंबर एकजवळील इमारतीत मुख्य लेखापरीक्षकांचे कार्यालय सध्या बंद आहे. ते कार्यालय त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या तरी लांघी यांचा मुक्काम शासकीय निवासस्थानातच असेल.