पुणे-बंगळुरू हरित महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:46 PM2022-10-20T15:46:11+5:302022-10-20T15:47:15+5:30

शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही जमिनी घेतली जाणार नाही

Additional compensation to farmers who are getting land in Pune-Bangalore Green Highway | पुणे-बंगळुरू हरित महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा मोबदला

पुणे-बंगळुरू हरित महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा मोबदला

googlenewsNext

सांगली : पुणे ते बंगळुरू हरित महामार्गासाठी जमिनी घेताना त्यांना निश्चित चांगला मोबदला देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही जमिनी घेतली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.

हरित महामार्गासाठी जमिनी घेण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी शेतकऱ्यांची बुधवारी बैठक बोलविली होती. या बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे राज्य संघटक दिगंबर कांबळे, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. बाबूराव लगारे, अर्जुन थोरात, पांडुरंग जाधव, सचिन करगणे, विनायक पाटील, प्रसाद खराडे, नामदेव पाटील, उद्धव मोहिते-पाटील, डॉ. ओमन पाटील, विश्वास साखरे, डॉ. प्रशांत यादव, संतोष गिरी, रंजित कोरे, प्रवीण माळी, पोपट पाटील, सचिन नलावडे, पृथ्वीराज पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

बैठकीतील निर्णयाबद्दल दिगंबर कांबळे म्हणाले की, या बैठकीमध्ये हरित महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला देण्यासह विविध प्रश्नांवर तासभर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाकडे शेतकऱ्यांचे निवेदन पाठविले होते. त्याचे लिखित पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रत्येक गावातील बाजारभावाचा जास्तीचा दर धरून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. भूमी अधिकरण कायद्याप्रमाणे भूसंपादन केले जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

उद्यापासून संवाद यात्रा : दिगंबर कांबळे

हरित महामार्गासाठी शासन जमिनी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दि. २१ ऑक्टोबरपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांची संवाद यात्रा जाणार आहे. जनजागृती संवाद यात्रेची सांगता दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गव्हाण (ता. तासगाव) येथे जाहीर सभेने होणार आहे, अशी माहिती दिगंबर कांबळे यांनी दिली.

Web Title: Additional compensation to farmers who are getting land in Pune-Bangalore Green Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.