सुधारित अर्थसंकल्पात १५ कोटींची वाढीव तरतूद
By admin | Published: July 17, 2014 11:26 PM2014-07-17T23:26:44+5:302014-07-17T23:39:01+5:30
जिल्हा परिषद : अर्थ समितीत निर्णय; ३० जुलैरोजी अंतिम मंजुरी; स्थानिक निधीत वाढ
सांगली : जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवारी अर्थ समितीच्या सभेत प्रथम सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यापूर्वी जाहीर झालेल्या २८ कोटी ६१ लाख रुपयांच्या मूळ तरतुदीखेरीज सुधारित अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी १४ कोटी ९८ लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ४३ कोटी ६० लाख रुपये रकमेचा झाला आहे. दरम्यान स्थानिक विकास निधीमध्ये ३ लाखांची वाढ करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचा २८ कोटी ६१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प कासेगाव (ता. वाळवा) येथे झालेल्या सभेत मांडण्यात आला होता. त्यावेळी विषय समित्यांच्या निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून येणेबाकीपैकी १९ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. साहजिकच प्रथम सुधारित अर्थसंकल्पात ही उणीव भरुन काढण्यात येणार असल्याचे संकेत अर्थ समिती सभापती आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिले होते. त्यानुसारच अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. आज झालेल्या अर्थ समितीच्या सभेत सुधारित अर्थसंकल्प मांडला गेला. आता तो ३० जुलैरोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब त्याचवेळी होणार आहे.
महिला, बालकल्याण विभागाच्या व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी ६ लाख ६८ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७ वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या संगणक प्रशिक्षण योजनेसाठी ११ लाख, महिलांना विविध साहित्य पुरविण्यासाठी ८ लाख ४२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. अपंग घरकुल योजनेसाठी ८६ लाख, नैसर्गिक आपत्ती सहाय्यतासाठी १० लाख, समाजकल्याणच्या वसंत घरकुल योजनेसाठी ७० लाख, मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साहित्य पुरविण्यासाठी २५ लाख, कृषी विभागातील चाप कटरसाठी २५ लाख, शेती गोदामे बांधणे आणि दुरुस्तीकरिता १४ लाख ५० हजार, शेतकऱ्यांना ताडपत्री पुरविणे २० लाख १ हजार, शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानात स्प्रे पंप पुरविणे ४ लाख ५० हजार, पशुसंवर्धन विभागातील शेळी गटवाटप योजनेसाठी १५ लाख, शाळांना भौतिक सुविधा पुरविणेकामी २४ लाख ५० हजार, शाळांमध्ये संगणकासाठी ५० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)