संखमध्ये गर्दी हटविण्यासाठी अपर तहसीलदार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:37+5:302021-05-10T04:26:37+5:30
संख : संख (ता. जत) येथील मुख्य शिवाजी चौकात फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी गर्दी केली होती. बंदोबस्तावरील पोलीस, होमगार्ड ...
संख : संख (ता. जत) येथील मुख्य शिवाजी चौकात फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी गर्दी केली होती. बंदोबस्तावरील पोलीस, होमगार्ड गायब होते. गर्दी पाहून स्वतः अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी रस्त्यावर उतरून विक्रेते, विनाकारण फिरणाऱ्या लोकांना हटविले.
गर्दी कमी झाल्यावर उशिरा पोलीस, होमगार्ड दाखल झाले.
संख पोलीस चौकीत पोलीस, होमगार्ड उपस्थित नव्हते. तहसीलदारांनी लोकांना सूचना देत गर्दी कमी केली. विनामास्क, विनाकारण फिरू नका, गरज असेल तरच बाहेर पडा, असे सांगत विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाला मदत करा, असे आवाहन केले.
त्यानंतर अपर तहसीलदार म्हेत्रे यांनी खासगी रुग्णालयांना भेट दिली. खासगी डॉक्टरांनी रुग्णांचे रजिस्टर ठेवावे. मी स्वतः ते बघणार आहे. कोविड रुग्ण असल्यास तुम्ही तपासणी, उपचार करू नका. प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात पाठवा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. अन्यथा परवाने रद्द करण्यात येतील, अशा इशारा दिला.