सुहैल शर्मा म्हणाले, विनाकारण फिरणार्यांवर कारवाई होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 04:36 PM2020-05-04T16:36:24+5:302020-05-04T16:38:27+5:30
दुचाकीवर एकच व्यक्ती तर चारचाकीतून दोन व्यक्तींनी प्रवास करावयाच असून याचे उल्लंघन करणार्यांवरही आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा लॉक असणार असून प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
सांगली : जिल्ह्यातील जनतेने गेल्या महिन्याभरापासून दाखविलेला संयम व शिस्तीमुळे जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नसल्याने नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊ नये. दुकाने सुरू करतानाही सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणारी दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील. शिवाय विनाकारण फिरणाार्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.
लॉकडाऊनला मिळालेल्या शिथीलतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने दाखविलेल्या शिस्तीमुळे कोरोना रूग्णांची संख्या मर्यादीत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असलीतरी कोरोनाचे संकट अजून टळले नाही. त्यामुळे दुकाने सुरू करतानाही नियमांचे पालन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सोशल डिस्टनसिंग मॅनेजमेंट टिम तयार करण्यात येणार आहे. ही टीम सर्वत्र फिरून नियमांचे पालन होते की नाही याची पाहणी करणार आहे.
दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर रंगाने चौकोन तयार करणे बंधनकारक असून दुकानातही ग्राहक व दुकानदारात तीन फूटाचे अंतर असावे. शिवाय ग्राहक व दुकानदार दोघांनीही मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे पालन न करणारी दुकाने त्वरीत बंद करण्यात येतील.
दुचाकीवर एकच व्यक्ती तर चारचाकीतून दोन व्यक्तींनी प्रवास करावयाच असून याचे उल्लंघन करणार्यांवरही आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा लॉक असणार असून प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी सर्व नाक्यांवर पोलीसांचे पथक कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.