प्रशासनाचा अंदाज ७५० कोटींच्या नुकसानीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:57 PM2019-08-30T23:57:18+5:302019-08-30T23:57:23+5:30

सांगली : जिल्ह्यात महापुरामुळे अमाप नुकसान झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने मात्र ७५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला ...

Administration estimates loss of 2 crore! | प्रशासनाचा अंदाज ७५० कोटींच्या नुकसानीचा!

प्रशासनाचा अंदाज ७५० कोटींच्या नुकसानीचा!

Next

सांगली : जिल्ह्यात महापुरामुळे अमाप नुकसान झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने मात्र ७५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. यात वाढ होण्याची शक्यता सांगितली असून, तसा अहवाल शुक्रवारी केंद्रीय पथकाला देण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाहणीनंतर खुद्द खासदार संजयकाका पाटील यांनी साडेतीन हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज सांगितला असताना, प्रशासनाने प्राथमिक अंदाजातच इतकी कमी आकडेवारी कशी दाखवली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापुरात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधत पथकाची पाहणी व बैठकीबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेटी देत पाहणी केली आहे. यात शेतीचे नुकसान, पाण्यामुळे धोकादायक बनलेल्या घरांसह वाणिज्यिक नुकसानीची पाहणी केली आहे. दोन गटामध्ये या पथकाने पाहणी करत पूरग्रस्तांशीही संवाद साधला. पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने सुरू आहेत. ७५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विविध विभागांतील पंचनामे अंतिम टप्प्यात असले तरी, शेतीसह, घरांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असून, केंद्रीय पथकाला अहवाल सादर करण्यात आला आहे.
अद्यापही शेती, घरांचे नुकसान यासह इतर विभागातील पंचनामे बाकी आहेत. यातील अनेक विभागांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर लवकरच पुरामुळे झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समजणार आहे. पुरामुळे झालेल्या व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे रविवारपर्यंत पूर्ण होणार आहेत. अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या पुरामध्ये पाणी थांबण्याचा कालावधी जास्त असल्याने नुकसानही वाढले आहे. शिवाय शेतीच्या नुकसानीत पिकांसह कृषिपंप व इतर साहित्याचे अधिक नुकसान झाले आहे.
महापूर ओसरून पंधरा दिवस झाल्यानंतरही अजून पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यातच व्यावसायिक नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत संभ्रमावस्था आहे. प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभागांनी जिल्हा प्रशसनाकडे अहवाल दिला असून, त्यांच्या नुकसानीचे आकडे शेकडो कोटीत आहेत. केवळ महापालिकेच्या यंत्रणेचेच १२० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आयुक्तांनी क्यक्त केला आहे. महापालिकेचे रस्ते, शाळा, उद्याने, पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज यंत्रणा, रुग्णालये यांचेच १२० कोटीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ४८४ किलोमीटरच्या रस्त्यांची हानी झाली आहे.
सांगली-मिरज शहरांसह १०४ गावांना महापुराचा फटका बसला. ६६ हजार ९८ हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मालमत्ता, घरांची हानी झाली. ही प्राथमिक आकडेवारीच पाच ते सात हजार कोटीवर जाऊ शकते. खासदार संजयकाका पाटील यांनी महापुरानंतर लगेच व्यक्त केलेला अंदाज साडेतीन हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा होता. मात्र प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजात केवळ ७५० कोटीची आकडेवारी दाखवण्यात आली आहे. या अहवालावरच केंद्र शासनाकडून देण्यात येणारा मदतनिधी ठरविण्यात येतो. प्राथमिक अंदाजच इतका कमी असेल तर अंतिम नुकसानीची सांख्यिकी आकडेवारीही तितक्या प्रमाणातच असेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Administration estimates loss of 2 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.