सभागृह नामकरणावरून प्रशासनाचे हात वर...
By admin | Published: November 4, 2015 11:20 PM2015-11-04T23:20:01+5:302015-11-05T00:09:57+5:30
वाळवा पंचायत समिती : वसंतदादा पाटील यांचे नाव कायम
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीच्या नव्या इमारतीमधील सभागृहाच्या नामकरणावरुन बांधकाम उपअभियंत्यासह गटविकास अधिकाऱ्यांनी हात वर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांना प्राप्त झालेल्या लेखी प्रशासकीय पत्रव्यवहारात, शासनाची परवानगी न घेता केवळ ठरावाद्वारे परस्परच नामकरण केल्याचे म्हटले आहे.पंचायत समितीच्या नव्या इमारतीमधील सभागृहाला सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसने ‘लोकनेते राजारामबापू पाटील सभागृह’ असे नाव देण्याचा ठराव २५ जुलै २0१४ च्या सभेत केला होता. दरम्यान, ही नवीन इमारत अद्याप बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. पंचायत समितीकडे तिचे हस्तांतरण झालेले नाही. तसेच शासनाने कोणत्याही इमारतीत मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र हे परिपत्रक निदर्शनास न आल्याने नामकरणाचा ठराव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले.दरम्यान, सभापती रवींद्र बर्डे यांनी १५ आॅक्टोबर रोजी परस्परच सभागृहाला ‘लोकनेते राजारामबापू पाटील सभागृह’ असा फलक लावला असून सभागृहातील तैलचित्रेही परस्पर लावली आहेत. त्याबाबतचा खर्च बांधकाम विभागाने केलेला नाही. तसेच बांधकाम उपअभियंत्यांनी पं. स.च्या नवीन सभागृहास पूर्वीचे ‘वसंतदादा पाटील सभागृह’ असे नाव कायम करण्याबाबतचा सविस्तर अहवालही गटविकास अधिकाऱ्यांना सादर केल्याचे महाडिक यांनी सांगितले. सभागृहाच्या नामकरणाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच हात वर केल्याने, हा विषय वाढण्याची चिन्हे आहेत. याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले आहे.दरम्यान, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील दादाप्रेमी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सम्राट महाडिक यांनी केले आहे. (वार्ताहर)
नाव देण्यास मनाई : वाद चिघळणार
शासनाने कोणत्याही इमारतीत मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र हे परिपत्रक निदर्शनास न आल्याने नामकरणाचा ठराव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले. नामकरणाबाबत प्रशासनाने हात वर केल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.