प्रशासनाचे वाळू माफियांनाअभय : जतच्या आमसभेत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:16 AM2018-10-13T00:16:03+5:302018-10-13T00:16:50+5:30
जत तालुक्याच्या पूर्व भागात वाळूचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरू आहे. संखचे अतिरिक्त तहसीलदार नागेश गायकवाड यांचे वाळू व्यवसायाला अभय आहे. काही तलाठ्यांनी आपली वाहने वाळू वाहतूक करण्यासाठी लावली आहेत.
जत : जत तालुक्याच्या पूर्व भागात वाळूचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरू आहे. संखचे अतिरिक्त तहसीलदार नागेश गायकवाड यांचे वाळू व्यवसायाला अभय आहे. काही तलाठ्यांनी आपली वाहने वाळू वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. याचे रेकॉर्डिंग व कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे गायकवाड यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून मालमत्तेची तपासणी करावी, असा ठराव जत पंचायत समितीच्या आमसभेत संमत करण्यात आला. आमदार विलासराव जगताप अध्यक्षस्थानी होते.
जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता ए. एच. शेख हे ग्रामपंचायतीमार्फत आलेले दलित वस्तीच्या विकास कामांचे प्रस्ताव टक्केवारी घेतल्याशिवाय तयार करत नाहीत. मागील पंधरा वर्षापासून ते येथे ठाण मांडून बसले आहेत. सुमारे सात कोटी रुपये निधी पडून आहे. शेख यांची बदली झाली आहे. शेख यांना तात्काळ कार्यमुक्त करून, त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जत पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी यावेळी दिला. यावेळी याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे व आमदार विलासराव जगताप यांनी दिले.
शेगाव (ता. जत) येथील वीज वितरण कार्यालयातील शाखा अभियंता पी. के. माने शेतकऱ्यांशी व्यवस्थित बोलत नाहीत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर फोन उचलत नाहीत. ते कार्यालयात उपस्थित नसतात. त्यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी लक्ष्मण बोराडे यांनी केली.
सांगली जिल्ह्याला सात-बारा संगणकीकरण केल्याबद्दल बक्षीस मिळाले असले तरी, जत तालुक्यातील काम पूर्ण झालेले नाही. महसूल विभागाने केलेली चूक दुरुस्त करण्यासाठी शेतकºयांना फॉर्म भरून द्यावा लागत आहे. त्यासाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत. यापुढे फॉर्म भरून न घेता शेतकºयांना उतारा दुरुस्त करून द्यावा. प्रत्येक मंडलात ही सोय करावी, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला.
कुंडलिक दुधाळ, रवींद्र सावंत, यशवंत हिप्परकर, सरदार पाटील, प्रभाकर जाधव, नाथा पाटील, लक्ष्मण एडके, सुजय शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला. प्रारंभी गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, डॉ. रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, प्रभाकर जाधव, महादेव पाटील, मंगल जमदाडे, कविता खोत, श्रीदेवी जावीर, सुनंदा तावशी, मनोज जगताप, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, भूपेंद्र कांबळे, इकबाल गवंडी, संतोष मोटे, संजय सावंत, उमेश सावंत, शिवाप्पा तांवशी उपस्थित होते. सभापती शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.
दुष्काळ जाहीर करा
जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. आता रब्बी वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यात चारा व पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या, चारा डेपो, टँकर सुरू करावेत. वीजबिल माफ करून पीकविम्याची रक्कम मिळावी, म्हैसाळ कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे बिल टंचाई निधीतून भरावे व साठवण तलाव भरुन मिळावेत, असा ठराव संमत करण्यात आला.