निर्बंध शिथिलतेबाबत प्रशासनाने पर्याय सुचवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:05+5:302021-07-19T04:18:05+5:30
सांगली : जिल्ह्यात दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे जनता व व्यापारी हतबल झाले आहेत. त्यामुळे शहर व गावांमधील पादुर्भाव पाहून शिथिलता देण्यासाठी ...
सांगली : जिल्ह्यात दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे जनता व व्यापारी हतबल झाले आहेत. त्यामुळे शहर व गावांमधील पादुर्भाव पाहून शिथिलता देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पर्याय द्यावेत, अशी सूचना कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी केली.
ते म्हणाले की, गेली तीन महिने सांगली जिल्हा लॉकडाऊनमध्ये आहे. यामुळे व्यापारी व जनता कमालीची हतबल झाली आहे. मोठा त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे. सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी आहे. रुग्णसंख्येअभावी अनेक हॉस्पिटल कोरोनामधून बाहेर पडली आहे. ऑक्सिजन बेडवर सातत्याने महिनाभर ८०० ते साडेआठशेच रुग्ण आहेत. ही संख्या वाढत नाही.
अशा परिस्थितीत लॉकडाऊनमधून काही शिथिलता द्यावीच लागेल. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे, अशी ठिकाणे वगळून अन्यत्र शिथिलता देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्याय काही सुचविण्याची गरज आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने एक दिवस व इतर दुकाने एक दिवस उघडण्यासारखे काही अन्य नियोजन करणे गरजेचे आहे.
प्रशासनाने पर्याय सुचविल्यानंतर यावर पालकमंत्री जयंत पाटील व आम्ही सोमवारी निर्णय घेऊ. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी यावेळी चर्चा झाली. त्यांनी अंशत: किंवा पर्यायांवर शिथिलता देण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे चौघेजण पर्याय सादर करणार असल्याची माहिती विश्वजित कदम यांनी दिली. या पर्यायावर सोमवारी, दि. १९ रोजी अंमलबजावणी केली जाणार आहे.