फायर ऑडिट : सांगली सिव्हिलसाठी पैसे मागून प्रशासन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 10:57 AM2021-04-26T10:57:20+5:302021-04-26T11:00:12+5:30
Hospital Sangli : राज्यात कोठेतरी रुग्णालयात आग लागते, निष्पाप रुग्ण दगावतात, अशावेळी राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे फर्मान शासन काढते. गेल्या दिड-दोन वर्षांत किमान चारदा असे आदेश निघाले. पण जुन्या शिफारशींचीच अंमलबजावणी होत नसेल तरर नव्याने ऑडिटचा उपद्व्याप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगली : राज्यात कोठेतरी रुग्णालयात आग लागते, निष्पाप रुग्ण दगावतात, अशावेळी राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे फर्मान शासन काढते. गेल्या दिड-दोन वर्षांत किमान चारदा असे आदेश निघाले. पण जुन्या शिफारशींचीच अंमलबजावणी होत नसेल तरर नव्याने ऑडिटचा उपद्व्याप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भंडार्यातील आगीनंतर सरकारी रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते, त्याचवेळी सांगली, मिरज सिव्हिलसह जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांची तपासणी झाली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भंडारा दुर्घटनेपूर्वीच ऑडिटचे आदेश दिले होते. तत्पूर्वी सांगली शासकीय रुग्णालयाचे ऑडिट २०१८ मध्ये झाले होते. अग्नीशमनविषयी कामांसाठी १ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला, तो अजूनही धूळ खात पडला आहे. आता विरारमधील दुर्घटनेनंतर पुन्हा ऑडिटचे आदेश निघाले आहेत.
सांगली-मिरजेत रुग्णालयांच्या नव्या इमारतींसाठी कोट्यवधींचा खर्च होत असताना अग्नीरोधी उपायांसाठी एक-दोन कोटींचाही खर्च केला जात नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. सिव्हिल प्रशासन व सार्वजनिक बांधकामच्या पाहणीत रुग्णालयांच्या भल्यामोठ्या पसार्यात पुरेशी अग्नीरोधी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले. ठिकठिकाणी सिलिंडर नाममात्र अडकवून वेळ मारुन नेली जात आहे.
सिव्हिलमध्ये स्प्रिंकलर्स, स्मोक डिटेक्टर्स, गरजेनुसार वीजवाहिन्या व अंतर्गत फिटींग, आग्नीशमनासाठी पाणीपुरवठा, नवे फायर एक्स्टीनगिशर्स बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी पावणे दोन कोटींची फाईल आरोग्य संचालनालय, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम या सर्वांकडे फिरुन आली आहे, पण निर्णय झालेला नाही. राज्यात दुर्घटना घडताच ऑडिटच्या वल्गना करणारे शासन शुद्ध फसवणूक करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.
सात कोविड रुग्णालयांत सिलिंडरदेखील नाही
सांगली-मिरजेतील सात खासगी कोविड रुग्णालयांत साधा फायर एक्सटिनगिशरदेखील नसल्याचे अग्नीशमन विभागाच्या पाहणीत आढळले. मिरज रस्त्यावरील एक खासगी कोविड रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल आहे, तेथे अग्नीशमन यंत्रणेचा पत्ताच नसल्याचे दिसले.
यंत्रणा सुसज्ज, कर्मचारीच नाही
सांगली, मिरजेतील काही खासगी कोविड रुग्णालयांत सुसज्ज अग्नीशमन यंत्रणा आहे. तारांकित रुग्णालयांच्या दर्जाची उपकरणे बसविली आहेत, पण ती हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याचे फायर ऑडिटमध्ये आढळले. ऑडिट सुरु असताना तात्पुरता एखादा कर्मचारी उभा केला जातो, अधिकार्यांची पाठ फिरताच दुर्लक्ष होते. अग्नीशमन विभागाने त्यांना नोटीसा बजावल्या असून प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यास सांगितले आहे.