ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावर प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:31 AM2021-01-08T05:31:31+5:302021-01-08T05:31:31+5:30
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. माघारी अर्ज आणि निवडणूक चिन्ह वाटपानंतर गावा-गावात प्रचाराची रंगत ...
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. माघारी अर्ज आणि निवडणूक चिन्ह वाटपानंतर गावा-गावात प्रचाराची रंगत वाढत आहे. मात्र, गावपातळीवर सुरू असलेल्या या प्रचारावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. याबाबत पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, आचारसंहितेच्या अंमलबजावणीबरोबरच कायदा व सुव्यवस्थेवरही महसूलसह पोलीस पथकाचे लक्ष असणार आहे.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४१ ठिकाणी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर सोमवार, दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे.
सध्या गावपातळीवरील प्रचार सुरू झाला असला तरी यंदा कोरोनाविषयक नियमांसह आचारसंहितेची अंमलबजावणी आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी तालुकापातळीवर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावनिहाय तयार पथकाकडून प्रचारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याबाबत कोणतीही तक्रार असल्याने तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.