विश्वजित कदम यांच्याकडून प्रशासनाची कानउघडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:26 AM2021-04-25T04:26:10+5:302021-04-25T04:26:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात ‘क्वारंटाईन’च्या नियमांचे पालन केले जात नाही. रुग्णांचे नातेवाईक राजरोस बाहेर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात ‘क्वारंटाईन’च्या नियमांचे पालन केले जात नाही. रुग्णांचे नातेवाईक राजरोस बाहेर फिरत आहेत. यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. याबाबत सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ग्रामदक्षता समित्यांची कानउघडणी केली.
कदम यांनी शनिवारी कडेगाव तालुक्यातील शिरसगाव व चिंचणी येथे भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली. उपाययोजनांचा आढावा घेतला. तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी डॉ. दाजी दाईगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, डॉ. सागर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्यांची संख्या वाढवा. ४५ वर्षांवरील लोकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. कोरोना विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास संबंधित परिसर लगेच सील करा. ‘क्वारंटाईन’ची सक्तीने अंमलबजावणी करा.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेळीच दक्षता घ्या, असे सांगत कदम यांनी महसूल आणि आरोग्य अधिकाऱ्यांना ताकीद दिली.
चौकट
आशा स्वयंसेविकांना सहकार्य करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना नागरिकांनी सहकार्य करावे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने त्यांना मास्क, हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन असे साहित्य द्यावे, असे डॉ. विश्वजित कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.