‘टेंभू’च्या ७ हजार ३७० कोटींच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता, हिवाळी अधिवेशनात मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:50 AM2023-12-15T11:50:22+5:302023-12-15T11:50:54+5:30
मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादही
सांगली/नागपूर : टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील वंचित ५३ गावांचा नव्याने समावेश झाल्यामुळे योजनेचा सुधारित खर्च सात हजार ३७० कोटींवर गेला आहे. या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी प्रशासकीय मान्यता दिली.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभू सिंचन योजनेवर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच, तीन हजार ७०० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मंजुरी मिळाली आहे. पण, खानापूर तालुक्यातील १५, आटपाडी १३, तासगाव १३, कवठेमहांकाळ ८ आणि जत ४ अशी ५३ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वंचित ५३ गावांना पाणी देण्यासाठीचा सुधारित सात हजार ४७५ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
१.२१ लाख हेक्टर शेती पाण्याखाली येणार
या मंजुरीमुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख २१ हजार ४७५ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. यासाठी अतिरिक्त ८ टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेंतर्गत माण-खटाव तालुक्यांसाठी २.५ टीएमसी, सांगली जिल्ह्यासाठी ४.५ टीएमसी आणि सांगोला तालुक्यासाठी एक टीएमसी जादा मिळणार आहे. या सुधारित खर्चासह अतिरिक्त आठ टीएमसीच्या पाण्यासही केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादही
टेंभू योजनेच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मंजुरी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाल्यानंतर भाजपचे खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी विटा शहरात एकच जल्लोष केला. या दोन्ही नेत्यांच्या आटपाडी, तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही सोशल माध्यमांवर श्रेयवादाचे राजकारण चांगलेच पेटले होते.