सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात
By शीतल पाटील | Published: August 18, 2023 07:36 PM2023-08-18T19:36:49+5:302023-08-18T19:37:01+5:30
वाहने, कार्यालय ताब्यात घेण्याचे आदेश.
सांगली : महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासकाच्या ताब्यात जातील. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने आजचा दिवस नगरसेवकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला. दरम्यान, महापौरांसह विविध पदाधिकाऱ्यांची कार्यालये, वाहने ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.
महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. गुरुवारी शेवटची महासभा तर शुक्रवारी स्थायी समितीची सभा झाली. दोन्ही सभेत सदस्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशासनाच्यावतीने नगरसेवकांना स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात आले. नगरसेवकांची मुदत शनिवारी संपणार असली तरी सुट्टीचा दिवस असल्याने एकदिवस आधीच त्यांची मुदत संपली.
दरम्यान आयुक्त सुनील पवार यांनी महापौर, स्थायी समिती सभा, गटनेत्यांची वाहने, कार्यालये, मोबाईल ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. पदाधिकाऱ्यांची कार्यालये शुक्रवारी सायंकाळी सील करण्यात आली. पदाधिकाऱ्यांकडे कार्यरत स्वीय सहाय्यक, शिपाई, लिपीक पदावरील कर्मचाऱ्यांना इतर विभागात तातडीने बदली करण्याची सूचना देण्यात आली आहे. स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी शुक्रवारीच आपल्याकडील वाहन प्रशासनाच्या ताब्यात दिले.
महासभा, स्थायीचे इतिवृत्त सीलबंद
महापालिकेची शेवटची सभा गुरुवार १७ रोजी तर स्थायीची सभा शुक्रवार १८ झाली. नगरसेवकांची मुदत १९ रोजी संपणार असली तरी आयुक्त पवार यांनी दोन्ही सभागृहातील सभेचे मिनिटस्, इतिवृत्त सीलबंद करून ताब्यात घेण्याचे आदेश उपायुक्तांना देण्यात आले आहेत.
प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे
महापालिकेचा कारभार आयुक्तांच्या हाती येणार असला तरी शासनाकडून अधिकृत मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर सोमवारपर्यंत शिक्कामोर्तब होईल.