‘वालचंद’ बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

By admin | Published: July 10, 2017 11:33 PM2017-07-10T23:33:42+5:302017-07-10T23:33:42+5:30

‘वालचंद’ बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

Administrators welcome Walchand shut down | ‘वालचंद’ बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

‘वालचंद’ बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे स्वागत सोमवारी ‘महाविद्यालय बंद’ने करण्यात आले. ‘वालचंद’मधील सर्वच कार्यालये कुलूपबंद असल्याने प्रशासकांना संगणक प्रयोगशाळेत बैठक घ्यावी लागली. महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. परिशवाड यांच्यासह २५० प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. दरम्यान, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
येथील सुप्रसिद्ध वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी व अजित गुलाबचंद यांच्या व्यवस्थापन समितीमध्ये वाद सुरू आहे. गतवर्षी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटात जोरदार वाद झाला होता. अखेर शनिवारी वालचंद महाविद्यालयावर राज्य शासनाकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक, शासननियुक्त सदस्य मकरंद देशपांडे व आयसीसीआय दिल्लीचे प्रतिनिधी अशी तीन सदस्यांची नेमणूक केली आहे. सोमवारी प्रमोद नाईक यांनी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविली होती. प्रशासक मंडळाकडून दैनंदिन कामकाजासही सुरुवात करण्यात येणार होती. पण या प्रयत्नांवर पाणी फिरले.
प्रशासक नाईक, मकरंद देशपांडे सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयात दाखल झाले. त्यांचे स्वागत महाविद्यालय बंदने करण्यात आले. सोमवारची सुटी शनिवारीच जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणताही सण, जयंती, समारंभ नसतानाही महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. संचालक परिशवाड, उपसंचालक पी. जी. कुलकर्णी यांच्या कार्यालयांसह सर्व विभागांना कुलपे लावण्यात आली होती. महाविद्यालयाच्या आवारात शुकशुकाट होता. विद्यार्थी, प्राध्यापकांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक होती.
पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. महाविद्यालयातील कार्यालये उघडी नसल्याने, बैठक कोठे घ्यायची, असा प्रश्न प्रशासक मंडळासमोर होता. अखेर संगणक विभागाची प्रयोगशाळा उघडण्यात आली. तेथेच प्रशासक नाईक व देशपांडे यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला ३५० प्राध्यापक व कर्मचाऱ्यांपैकी केवळ ९० ते १०० जणच उपस्थित होते. संचालक परिशवाड, पी. जी. कुलकर्णी यांच्यासह अडीचशे जणांनी बैठकीला दांडी मारली होती.
बैठकीत मकरंद देशपांडे म्हणाले की, ‘वालचंद’ला नावारूपाला आणण्यासाठी सर्वांचेच योगदान राहिले आहे. व्यवस्थापनाबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने शासनाने दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यापुढे प्रशासक मंडळ जो निर्णय घेईल, त्यानुसार सर्वांनी सहकार्य करावे. महाविद्यालयातील वातावरण कुटुंबासारखे ठेवावे. नाईक यांनीही प्रशासक नियुक्तीमागची शासनाची भूमिका स्पष्ट करीत प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.
गैरहजर असणाऱ्यांना : नोटिसा
प्रशासक मंडळाच्यावतीने बैठकीचे निमंत्रण संचालक, उपसंचालकांसह सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. तरीही संचालक परिशवाड यांच्यासह अडीचशेजण गैरहजर होते. त्या सर्वांना नोटिसा काढून त्यांचा खुलासा मागविला जाईल. त्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, संचालक चंद्रशेखर ओक यांच्या निदर्शनास आणून, त्यांच्या आदेशाने गैरहजर राहणाऱ्यांवर पुढील कारवाई होईल, असे सहसंचालक नाईक यांनी स्पष्ट केले.
देशपांडे यांच्यावर जबाबदारी
प्रशासक मंडळात सहसंचालक प्रमोद नाईक, मकरंद देशपांडे व दिल्लीच्या एआयसीटीचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाला महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहावे लागणार आहे. त्यात मकरंद देशपांडे स्थानिक असल्याने तेच दैनंदिन कामकाजात लक्ष घालतील. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भविष्यात गरज भासल्यास कामकाजासंदर्भात विविध समित्याही स्थापन केल्या जातील, असेही नाईक यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची गैरसोय
वालचंद महाविद्यालयाला अचानक सुटी दिल्याने विद्यार्थी, पालकांची गैरसोय झाली. सध्या पदविका, पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी, पालक महाविद्यालयात आले, पण सुटी असल्याचे येथे आल्यानंतरच समजले. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. काही विभागाच्या परीक्षाही सोमवारी होत्या. संचालकांनी कोणतेच आदेश न दिल्याने परीक्षार्थींची कोंडी झाली.

Web Title: Administrators welcome Walchand shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.