SSC, HSC Exam: फेस स्कॅनिंगनंतरच परीक्षाकेंद्रात प्रवेश, बोर्डाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:53 IST2025-02-07T17:52:15+5:302025-02-07T17:53:49+5:30

गैरमार्गाची प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार

Admission to the 10th and 12th examination center will be done only after face scanning | SSC, HSC Exam: फेस स्कॅनिंगनंतरच परीक्षाकेंद्रात प्रवेश, बोर्डाचा निर्णय

संग्रहित छाया

सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम परीक्षा मंडळाकडून राबविण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणजे यावर्षी केंद्रावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना फेस स्कॅनिंग करूनच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केल्या आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच गैरमार्गाची प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेवेळी केंद्राबाहेर चित्रीकरण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके व बैठी पथके नेमण्यात येणार आहेत. केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, २०१८ पासूनच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत. तसे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण करण्यात येणार आहे.

सहा केंद्रांवर कर्मचाऱ्यांची सरमिसळ

जिल्ह्यात दहावीच्या दोन व बारावीच्या चार केंद्रांवरील सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत. दहावीचे ३९ हजार ६१९ आणि बारावीचे ३२ हजार ८३० असे एकूण ७२ हजार ४४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

Web Title: Admission to the 10th and 12th examination center will be done only after face scanning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.