मोक्षप्राप्तीसाठी योगाचा अंगीकार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:40+5:302021-02-13T04:25:40+5:30
योग पुरस्कार सोहळ्यात वसंतराव चंद्रात्रे यांना निवृत्त न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी यांच्या हस्ते योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जयश्री ...
योग पुरस्कार सोहळ्यात वसंतराव चंद्रात्रे यांना निवृत्त न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी यांच्या हस्ते योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, डॉ. बाळकृष्ण चिटणीस, गोपीचंद कदम, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करायचा तर योगाभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी यांनी केले. विश्वयोग दर्शन केंद्राच्या योग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्टस असोसिएशनच्या सभागृहात कार्यक्रम झाला.
केंद्राच्या अध्यक्षा जयश्री पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यावेळी उपस्थित होते. वग्याणी म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने स्वत:साठी काही वेळ काढलाच पाहिजे. योग हे त्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. गोपीचंद कदम म्हणाले, निरामय जीवनासाठी योग आवश्यक आहे. प्रत्येकाने ही जीवनशैली आत्मसात करायला हवी.
वग्याणी व कदम यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. वसंतराव चंद्रात्रे (चाळीसगाव) यांना योगरत्न, चंद्रशेखर खापणे (कोल्हापूर) यांना योगसंघटक, विजय माढेकर (ठाणे) यांना योग मार्गदर्शक, प्रतिभा पोरे यांना उत्कृष्ट योगशिक्षक, नितीन पवळे (पुणे) यांना उत्कृष्ट योगपटू पुरस्कार देण्यात आले.
विश्वयोग दर्शनचे केंद्राचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चिटणीस यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या योगपटूंनी योगा प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी केदार टाकवेकर, प्रमोद शिंदे, महेश पाटील, प्रकाश येलपले, महेश कराडकर, आदी उपस्थित होते. विष्णुअण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पतंजली योग केंद्र, इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्टस असोसिएशन व विश्व योग दर्शन केंद्राने याचे संयोजन केले.
-------