सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:36 PM2023-02-18T12:36:11+5:302023-02-18T12:36:57+5:30
एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले
सांगली : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच एसटीचे कंबरडे मोडल्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फरपट चालू आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश हंकारे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
हंकारे म्हणाले की, कोरोना आणि प्रदीर्घ संपातून एसटी आजही सावरलेली नाही. एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले आहे. ॲड. सदावर्ते, पडळकर आणि खोत यांनी एसटी कामगारांचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन करणारे सत्तांतर होताच शांत झाले आहेत.
आता गप्प कसे?
एसटी कर्मचाऱ्यांचा पुळका असणारे सदावर्ते, पळकर, खोत हे नेते कर्मचाऱ्यांचा बळी जात असताना गप्प कसे बसले आहेत? उच्च न्यायालयाकडे राज्य शासनाने महिन्याच्या १० तारखेपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला ३६० कोटी रुपये वर्ग केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र ठाकरे सरकारच्या काळात दाखल केले होते. तरीही शिंदे-फडणवीस सरकार महिन्याला ३६० कोटी रुपये एसटीला देत नाहीत. यामुळेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत.
यामुळेच आर्थिक संकटातील कवठेमहांकाळ आगाराचा चालक भीमराव सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण, असा सवालही हंकारे यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर सदावर्ते, पळकर, खोत काहीच बोलत नाहीत. पडळकर, खोत हे नेते तर सत्तेत असतानाही गप्प आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री यांच्याकडे निधीची मागणी
कामगार प्रश्नाचे राजकारण न करता न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दरमहा एसटी महामंडळास ३६० कोटी रुपये द्यावेत. तसेच कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत व्हावेत, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे केली आहे, अशी माहितीही प्रकाश हंकारे यांनी दिली.