सांगलीतील घरात ऐश्वर्य पाहिले, विश्वासघातही सोसला; बालपणीच्या वेदना मनात खोलवर रुजल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:59 AM2022-02-07T07:59:54+5:302022-02-07T08:08:29+5:30

मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

Affluence saw in the house in Sangli, also suffered betrayal; The pain of childhood was deeply ingrained in Lata Mangeshkar mind | सांगलीतील घरात ऐश्वर्य पाहिले, विश्वासघातही सोसला; बालपणीच्या वेदना मनात खोलवर रुजल्या

लता मंगेशकर यांनी नंतरच्या काळात एकदा कोटणीस महाराजांच्या मठास भेट दिली होती. त्याठिकाणच्या महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. 

googlenewsNext

अविनाश कोळी - 

सांगली :
नाट्यसंवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत दीदींचे सांगलीत बालपण बहरले. पण या वाटेवर वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. हेच अनुभव त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.

एस.टी. स्टँडजवळ कोटणीस महाराजांच्या मठासमोर मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते.  मंगेशकर कुटुंबीय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते राहायचे. इथे प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची ऊठबस असे. याच घरात लतादीदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले. दीदींचा जन्म इंदूर येथे झाला असला तरी नंतर मंगेशकर कुटुंबीय सांगलीत आले व स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्यसंस्कार झाले. याच ठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.

वैभवसंपन्न कुटुंबाची फरफट - 
मास्टर दीनानाथांची मुले म्हणून सांगलीत भावंडांना मानसन्मान मिळाला. १९३५ ते १९४० हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. ज्या सांगलीत त्यांनी आनंद, समृद्धी, मैत्री, नात्यांचा गोडवा, व्यावसायिक यश अनुभवले, त्याच सांगलीत त्यांना यातनादायी अनुभवही आले. मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

या कंपनीलाही अपयश आले आणि आर्थिक डोलारा कोसळला. राहत्या घरासह गाव सोडून पुण्याला स्थलांतरित होण्याची वेळ मंगेशकर कुटुंबीयांवर आली. सांगलीतील शेवटचे हलाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वांत वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत, अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.

जवळच्यांकडून घात -
नातलग, स्नेही अशा सर्वांनी मास्टर दीनानाथ यांचा विश्वासघात केला. पडत्या काळात त्यांची साथ सोडली. ‘कृष्णार्जुनयुद्ध’ या सिनेमाच्या व्यवहारामध्ये एक खोटी केस दीनानाथ यांच्यावर झाली. एका मित्राने मदतीच्या बहाण्याने घरातील सर्व दागिने काढून घेतले. नंतरच्या सुवर्णकाळातही लता मंगेशकर कधीही या घटना विसरू शकल्या नाहीत.

पन्हाळ्यावरील बंगला
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर त्यांना निवांत राहण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी मूळ बंगला पन्हाळ्यावर बांधला. त्यावेळी त्यांनी तो पूर्ण चुन्यात बांधून घेतला होता. नंतर जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी स्टुडिओ, पन्हाळ्याचा बंगला लताबाईंना विकला. नंतर लताबाईंनी बंगला पूर्ण पाडण्याच्या सूचना केल्या व तिथे पुन्हा नवीन बंगला बांधला.
 

Web Title: Affluence saw in the house in Sangli, also suffered betrayal; The pain of childhood was deeply ingrained in Lata Mangeshkar mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.