जतमध्ये प्रशासन, आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:58+5:302021-05-05T04:43:58+5:30
शेगाव : जत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण दररोज दीडशेहून अधिक आढळत आहेत. वेळेवर बेड मिळत नाहीत आणि उपचारही होत नाहीत. ...
शेगाव : जत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण दररोज दीडशेहून अधिक आढळत आहेत. वेळेवर बेड मिळत नाहीत आणि उपचारही होत नाहीत. यास आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील बहुतांश गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे, पण जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासकीय रुग्णालयात अवघे २५ बेड्स आहेत. एक कोविड रुग्णालय आहे. मात्र व्हेंटिलेटरची सुविधा नाही. जूनमध्ये शासनाने पाच व्हेंटिलेटर दिले होते, ते कुठे आहेत हेच अधिकाऱ्यांना माहीत नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा किती व कोणाकडे आहे, हे तहसीलदार, प्रांताधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांना कोणालाही माहिती नाही. आरोग्य विभागाच्या अनेक जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. शासकीय रुग्णालयात १२३ पदे रिक्त आहेत. संख येथील ‘१०८’ रुग्णवाहिका डॉक्टरअभावी बंद आहे. .