तासगाव तालुक्यात २६ अर्ज बाद
By admin | Published: October 19, 2015 11:05 PM2015-10-19T23:05:17+5:302015-10-20T00:18:01+5:30
पोलिसांचा बंदोबस्त : विजयनगर, मोराळे (पेड) बिनविरोध
तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या ३९१ जागांसाठी १५२३ अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्ज छाननीमध्ये २६ अर्ज बाद झाल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली. दरम्यान, विजयनगरपाठोपाठ मोराळे (पेड) ग्रामपंचायतीसाठी ७ अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या दोन्ही गामपंचायती भाजपच्या असल्याचा दावा खा. संजयकाका पाटील गट करीत आहे.
तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने लढल्या जात आहेत. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक कार्यकर्त्यांची समजूत काढून अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु, नेत्यांच्या शिष्टाचारास काही कार्यकर्ते दाद देत नाहीत. सोमवारी १५२३ अर्जांपैकी २६ अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे छाननीसाठी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत होती. यावेळी कार्यालयाबाहेर झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे व सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
पलूसच्या १४ ग्रामपंचायतींसाठी ७५१ अर्ज पात्र
किर्लोेस्करवाडी : पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७६६ अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये १९ रोजी झालेल्या छाननीमधून १५ अर्ज बाद झाले. यापैकी निवडणुक ीस पात्र असलेल्या अर्जांची संख्या ७५१ आहे. दि. २१ रोजी अर्ज माघारीचा दिवस आहे. किती अर्ज मागे घेतले जाणार, हे याचदिवशी समजणार आहे. जे अर्ज यामध्ये राहतील, त्यांना २१ रोजीच चिन्हांचे वाटप होणार आहे. तालुक्यात सध्या ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये चढाओढ दिसत आहे. काही ठिकाणी तर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये दोन-दोन गट असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन फुटलेल्या गटांची मतविभागणी होणार असल्याने सर्वच पॅनेलनी कंबर कसली आहे.