सत्ताधाऱ्यांसह मातब्बरांचे अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 11:44 PM2016-04-27T23:44:03+5:302016-04-28T00:14:13+5:30
वसंतदादा कारखाना निवडणूक : छाननीत धक्का, वादावादी
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा विद्यमान संचालकांसह अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी गटाला बुधवारी धक्का बसला. कारखान्याला तीन वर्षे ऊस न दिल्याच्या कारणावरून सत्ताधारी गटासह विरोधी शेतकरी संघटना व अन्य इच्छुकांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारांमध्ये वादावादीही झाली.
उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवारी वादावादी, तक्रारी आणि नाराजी नाट्यात पार पडली. ही प्रक्रिया धक्कादायक ठरली. विद्यमान संचालक सचिन डांगे, विजयकुमार पाटील, महादेव कोरे यांचे, तर सत्ताधारी गटाचेच निश्चित मानले जाणारे उमेदवार गुंडातात्या चौगुले, बापूसाहेब शिरगावकर, राजेंद्र नीळकंठ पाटील, नारायण पाटील यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचेच पॅनेल होणे मुश्कील झाले आहे. शेतकरी संघटनेच्या कोरे यांच्यासह संंभाजी मेंढे, दिलीप पाटील, बाजार समितीचे सभापती कुमार पाटील, उपसभापती जीवन पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, अशा मातब्बरांचेही अर्ज उसाच्या नियमात बाद झाले
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९0 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. छाननी प्रक्रिया संपली तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र होते. सत्ताधारी गटासह शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले. आरक्षित जागांवरील उमेदवारांना उसाचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून गेले आहे. या निवडणुकीत आता कोणाचेही पॅनेल होऊ शकत नाही.
उमेदवारी अर्जांची प्रक्रिया आरक्षित जागांच्या उमेदवारांपासून सुरू झाली. आरक्षित जागेवरील सर्वच्या सर्व ४0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर उत्पादक गटाची छाननी सुरू झाल्यानंतर सांगलीवाडीच्या प्रभाकर पांडुरंग पाटील यांच्या अर्जापासून वादाला सुरुवात झाली. त्यांचे नाव आष्टा गटात येत असताना, त्यांनी सांगली गटातून अर्ज दाखल केला होता. सूचकही सांगलीचाच घेतल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यावेळी वाद झाल्यानंतर पुन्हा कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस न दिल्याचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी त्यांचा अर्ज बाद ठरविला.
त्यानंतर उसाच्या मुद्द्यावर उमेदवारी अर्ज बाद होण्याचा सपाटाच सुरू झाला. त्यातून वादावादी, तक्रारी आणि रुसवा-फुगवीचा खेळ रंगला. बराच वेळ तीन वर्षे ऊस देण्याच्या नियमावलीवरून गोंधळ सुरू होता. आष्टेकर यांनी ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सर्व सहकारी साखर कारखान्यांसाठी आदर्श नियमावली लागू असल्याचे स्पष्ट केले. शेवटी त्यांनी निर्णय घेत छाननी प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण केली. (प्रतिनिधी)
तन्ही पत्ते कट
सांगली उत्पादक गटातून सत्ताधारी गटातर्फे गुंडा तात्या चौगुले यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांना पर्यायी उमेदवार म्हणून पंडित शंकर पाटील यांचा अर्ज, तर डमी उमेदवार म्हणून राहुल पाटील यांचा अर्ज दाखल केला होता. छाननीत हे तिन्ही अर्ज बाद ठरल्याने या गटातील उमेदवारीचा प्रश्न सत्ताधारी गटासमोर निर्माण झाला आहे.
भिलवडीमध्येही अडचणी
शेतकरी संघटनेचे दिलीप पाटील यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळणे निश्चित होते. मात्र, त्यांचाही अर्ज बाद झाला. याच गटातील आणखी काही अर्जही बाद झाले आहेत.
ओबीसी
गटात वाद
शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी आता इतर मागासवर्गीय गटातून दावेदारी केली आहे. मात्र, याच गटात खासदार संजय पाटील गटाने अनिल कुत्ते यांचा अर्ज दाखल करून दावेदारी केली आहे. त्यामुळे बिनविरोधाच्या चर्चेवेळी यातील एका गटाची नाराजी सत्ताधारी गटाला सोसावी लागणार आहे.
पूर्ण पॅनेलचे नियोजन सत्ताधारी गटाने केले होते. उमेदवारीबाबत प्राथमिक चर्चा होऊन अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांचे बहुतांश नियोजित उमेदवारच बाद झाल्याने पूर्ण पॅनेल होऊ शकत नाही. अनेक गटांमध्ये आता त्यांना उसनवारी करण्याची वेळ येणार आहे. शेतकरी संघटना किंवा हौसेखातर उभारलेल्या उमेदवाराला घेऊन गणित घालावे लागणार आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी गट, अशा प्रकारे उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर बाद झाल्याने अडचणीत आला आहे.