धरपकडीनंतर फोडाफोडी!

By admin | Published: June 2, 2017 11:16 PM2017-06-02T23:16:13+5:302017-06-02T23:16:13+5:30

धरपकडीनंतर फोडाफोडी!

After the arrest! | धरपकडीनंतर फोडाफोडी!

धरपकडीनंतर फोडाफोडी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी कोरेगावात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दूध अन् भाजीपाला रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. आंदोलनाची व्याप्ती पाहून पोलिसांनी आमदार शिंदेंसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. शिंदे यांना अटक झाल्याच्या चर्चेने संतप्त कार्यकर्त्यांनी तीन एसटी गाड्यांवर दगडफेक केली. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभर आंदोलकांची धरपकड करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी शेतकरी संपाला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला. सकाळी अकरा वाजता कोरेगावच्या आझाद चौकात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजीपाला रस्त्यावर टाकून आंदोलन केले. पोलिसांना पूर्वसूचना न देता अकस्मात झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रागसुधा रामचंद्रन, उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी फौजफाट्यासह आंदोलनस्थळी धाव घेत आमदार शिंदे यांच्यासह सुनील खत्री, राजाभाऊ जगदाळे व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना पोलिस जीपमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.
शिंदे यांच्या अटकेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच वातावरण तणावाचे बनले. ‘कोरेगाव बंद’ची हाक देण्यात आली. पोलिसांनी बंद हाणून पाडण्याच्या दृष्टीने बळाचा वापर करुन कार्यकर्त्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडले. व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी सातारा-पंढरपूर महामार्गावर विविध ठिकाणी तीन एसटी गाड्यांना लक्ष्य करत काचा फोडल्या.
तसेच शिंदे यांच्या अटकेच्या माहितीचे पडसाद नवी मुंबईतही उमटले. वाशी येथील मार्केट यार्डातील दुकाने व्यापाऱ्यांनी तत्काळ बंद केली. मुंबईहून कोरेगावात मोबाईल कॉल येऊ लागल्यानंतर कोरेगाव पोलिसांनी शिंदे यांना जामिनावर मुक्तता केले. त्यांना अटक केली नसून, त्यांच्यावर केवळ मुंबई पोलिस अधिनियमाप्रमाणे जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दुचाकीस्वारांनी फोडल्या एसटी बसेस
आमदार शशिकांत शिंदे यांच्या अटकेची माहिती समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर दहिवडी-सातारा एस. टी. बस (एमएच ०७ सी ७१७८), साखळी पुलावर सातारा-आटपाडी एसटी बस (एमएच १४ बीटी १६८७) व रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावर पोलीस ठाण्यानजीक रहिमतपूर-कोरेगाव एसटी बस (एमएच १२ ईएफ ६७६१) या गाड्यांवर दगडफेक करीत काचा फोडल्या. दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या. तीनही एस. टी. बसेस पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन लावण्यात आल्या.

Web Title: After the arrest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.