आम्ही सत्तेतून बाहेर पडताच राष्ट्रवादी भाजपाबरोबर नांदायला जाईल - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 01:35 PM2017-11-25T13:35:02+5:302017-11-25T14:17:43+5:30
जांभळी गावात शेतक-यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि भाजपावर टीका केली. मला माझ्या हक्काचं मंत्रिमंडळ हवं आहे असे त्यांनी सांगितले.
सांगली - शरद पवार म्हणतात सत्तेत नांदता येत नसेल तर वेगळं व्हा, आम्ही वेगळं होताच हे भाजपासोबत नांदायला जातील अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे आज सांगलीमध्ये आहेत. संध्याकाळी पाचवाजता त्यांची मिरजमध्ये जाहीर सभा होणार आहे.
जांभळी गावात शेतक-यांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार आणि भाजपावर टीका केली. मला माझ्या हक्काचं मंत्रिमंडळ हवं आहे. आता रडायचं नाही लढायचं. तुमची तयारी असेल मी तुमच्यासोबत आहे असे उद्धव म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करुन घेतात, तर मग महाराष्टतील व्यापारी हे का करु शकत नाहीत?, तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करत तुमची सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यापारी-उद्योजकांना दिली.
टेंबलाई उड्डाण पुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सच्यावतीने व्यापारी व उद्योजकांच्या जीएसटीसह विविध अडचणी व प्रश्नांबाबतचे निवेदन ठाकरे यांना देण्यात आले.
सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे ? असा टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकटात लाखा खायच्या अशी कोटीही ठाकरे यांनी यावेळी केली.
शुक्रवारी नेसरी येथील जाहीर सभेत बोलताना राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे ठाकरे म्हणाले होते. तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे, त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले? अशी विचारणा करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
दोन दिवसांच्या दौ-यात त्यांच्या पाच जाहीर सभा असून मुख्यत: ते शेतकरी, कामगार, उद्योजक अशा घटकांशी बोलणार आहेत. राज्यात ते सत्तेत वाटेकरी आहेत व त्यांचा दौरा मात्र सरकारच्या कारभाराची वाभाडी काढण्यासाठी आहे. ,‘कर्नाटकचा मुख्यमंत्री कानडी आलीच पाहिजे असे म्हणतो परंतू मराठी आलीच पाहिजे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत नाहीत हेच खरे दुर्देव आहे. शिवसेना सीमाभागातील मराठी माणसाच्या मागे कायमच ताकदीने उभी राहिली आहे. ती यापुढेही त्यांना बळ देईल. तुम्ही लोकांनी आज या सभेच्या निमित्ताने चंदगड भगवे करून दाखविले परंतू तेवढ्याने भागणार नाही. शिवसेनेला राज्याची सत्ता द्या. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही' असे ठाकरे म्हणाले.