वसंतदादा बॅँकेचा फैसला तज्ज्ञांच्या अहवालानंतर--दिलीपतात्या पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:21 PM2017-09-28T23:21:58+5:302017-09-28T23:23:10+5:30
सांगली : वसंतदादा बॅँक विलिनीकरणाच्या प्रस्तावाबाबत अर्थतज्ज्ञांच्या अहवालानंतरच निर्णय घेण्यात येईल,
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा बॅँक विलिनीकरणाच्या प्रस्तावाबाबत अर्थतज्ज्ञांच्या अहवालानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी वार्षिक सभेत दिले.
जिल्हा बॅँकेच्या सांगलीतील वसंतदादा पाटील सभागृहात दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी संचालक असलेले खासदार संजयकाका पाटील, आ. मोहनराव कदम, बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, डी. के. पाटील, बी. के. पाटील, प्रा. सिकंदर जमादार, सी. बी. पाटील, प्रताप पाटील, चंद्रकांत हाक्के, सौ. श्रद्धा चरापले, सौ. कमल पाटील, गणपती सगरे, विक्रम सावंत आदी उपस्थित होते.
ऐनवेळच्या विषयावर चर्चा सुरू असताना, एका सभासदाने वसंतदादा बॅँकेच्या विलिनीकरण प्रस्तावाचा विषय उपस्थित केला. वसंतदादा कारखान्याचा क्लिष्ट प्रश्न सोडविण्यात जिल्हा बॅँक अध्यक्षांना यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी आता वसंतदादा बॅँकेचाही प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली. यावर दिलीपतात्या पाटील म्हणाले की, वसंतदादा बॅँक विलिनीकरणाचा प्रस्ताव बॅँकेचे प्रशासक शीतल चोथे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनीही चर्चा केली आहे. प्रस्ताव आल्यानंतर चार्टर्ड अकौंटंट, जिल्हा बॅँकेचे कायदेशीर सल्लागार यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त होताच वसंतदादा बॅँकेचा प्रस्ताव स्वीकारायचा की फेटाळायचा याविषयी निर्णय होईल.
नोटाबंदी, विविध चौकशा आणि शासनाच्या निर्बंधांमुळे बॅँकेसमोर चालू वर्षात अनेक अडचणी निर्माण झाल्या. बॅँकेचा आर्थिक पाया मजबूत राखण्यात आम्ही यशस्वी झालो. गत आर्थिक वर्षात ढोबळ नफा ५१ कोटी ६५ लाख इतका झाला असून, १२ कोटी ९ लाखांचा निव्वळ नफा आहे. बॅँकेकडे सध्या ४ ४४५ कोटी ४४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. चालू वर्षात ठेवींचे उद्दिष्ट ५ हजार ३०० कोटींचे दिले आहे. १२१ कोटींचे भागभांडवल असून, ४०० कोटींचे नेटवर्थ आहे. ५२ कोटींचा स्वीय निधी असल्याने पाया मजबूत आहे. येत्या वर्षभरात जिल्ह्यातील एटीएमची संख्या ५० ते ६० च्या घरात जाईल. ८० हजार शेतकºयांनी रुपे डेबिट कार्ड घेतले असून, १ लाख ६७ हजार शेतकºयांकडे बॅँकेचे किसान कार्ड आहे.
‘एनपीए’वरून आक्षेप
सभासद असलेले तानाजी पाटील यांनी बॅँकेच्या वाढलेल्या ‘एनपीए’बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बॅँकेचा सध्याचा एनपीए १३ टक्के असल्याने याबाबत बॅँकेने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर अध्यक्ष पाटील म्हणाले की, निश्चितच नोटाबंदीसह अन्य प्रतिकूल कारणांमुळे बॅँकेच्या एनपीएमध्ये वाढ झाली आहे. येत्या मार्चअखेर वसंतदादा कारखाना ताब्यात घेणाºया दत्त इंडियाकडून ६० कोटी रुपये जमा होणार आहेत. याशिवाय थकबाकीदार असलेल्या आणखी काही मोठ्या संस्थांचीही वसुली प्रगतिपथावर आहे. त्यामुळे मार्चअखेर हा एनपीए पूर्वपदावर येईल.
बॅँकेत झालेले महत्त्वाचे ठराव
कारखाना व अन्य संस्थांना कर्ज देताना शासकीय करभरणा केल्याची खातरजमा होणार
बॅँकेच्या कर्मचाºयांची हक्काची रजा संचित ठेवण्याची मुदत २१० वरून २४० पर्यंत वाढली.
राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशा मागणीचा ठराव
सक्षम कारभाराबद्दल अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव