शेतकऱ्यांच्या हमीनंतर पुणदी योजना सुरू
By admin | Published: March 22, 2016 12:46 AM2016-03-22T00:46:55+5:302016-03-22T00:58:56+5:30
विसापूर-पुणदी योजनेची बैठक : नियोजनहीन कारभाराविरोधात तासगावात शेतकऱ्यांचा संताप
तासगाव : विसापूर आणि पुणदी उपसा सिंंचन योजनेतून लाभक्षेत्रातील गावांना नियोजन करुन पाणी दिले जात नाही. पाणी वाटपाचे धोरण निश्चित नाही. अधिकाऱ्यांच्या नियोजनहीन कारभारामुळेच पाण्यासाठी गावा-गावातील शेतकऱ्यांत भांडणे लागायची वेळ आली आहे, अशा शब्दात संताप व्यक्त करुन, नियोजनबध्द पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. विसापूर आणि पुणदी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी यापुढे पाणी योजनेच्या यंत्रणेत कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याची हमी शेतकऱ्यांनी दिल्यानंतर, पुणदी योजना तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी रात्री पाणी सोडण्याच्या कारणावरुन पुणदी योजनेच्या टप्पा क्रमांक दोनवर आरवडे आणि लोढे, भैरववाडीच्या शेतकऱ्यांत वादावादी झाली होती. याच वादातून काही शेतकऱ्यांनी पंपहाऊसमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्याला धमकावून पाणी बंद केले होते. या प्रकारानंतर पुणदी योजना बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी विसापूर आणि पुणदी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह पाणी योजनांचे अधिकारी, संबंधित गावांतील राजकीय पदाधिकारी, सरपंच, शेतकरी उपस्थित होते.
खासदार संजयकाका पाटील यांनी, पाणी योजनेच्या बाबतीत मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. एखाद्या व्यक्तीच्या ‘मी’पणामुळे सर्व शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असेल, तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीत सर्वांनी मिळून प्रयत्न करुन पाणी वाटून घ्यायला हवे. तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळत नाही, त्यासाठी पाठपुरावा करायला हवा. पाणी नसलेल्या गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व्हे करु. पाणी देणे हे कुणा खासदार, मंत्र्याची मेहेरबानी नाही. पाणी सर्वांना मिळायला हवे. त्यासाठी अधिकारी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नियोजन करा, असेही यावेळी खासदार पाटील यांनी सांगितले.
पाणी योजनेचे अधिकारी नाडे यांनी, अधिकाऱ्यांच्या नियोजनात शेतकरी हस्तक्षेप करत असतील, तर यापुढे पाणी मिळणार नसल्याचा इशारा दिला. तसेच या योजनेचे पाणी हे शेतीसाठी आहे. पिण्यासाठी पाणी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सर्व पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी देण्याचे नियोजन होणार नाही. आधी पाणीपट्टी भरणाऱ्या गावाला पहिल्यांदा पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा बॅँकेचे संचालक प्रताप पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य युवराज पाटील यांनीही शेतकऱ्यांची बाजू परखडपणे मांडली. अधिकाऱ्यांकडून पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन केले जात नाही. निश्चित धोरण नसल्यामुळे गावा-गावात वाद निर्माण होत आहेत. पाणी सोडताना ठोस निर्णय घेतला जात नाही. मिळणारे पाणी पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. काही ठिकाणी ठराविक क्षेत्रालाच पाणी मिळते, तर काही गावांना पाणीपट्टी भरुनही पाणी मिळत नसल्याचे सांगितले. तर गौरगाव, पाडळी, धामणी, सावळजसह काही गावातील शेतकऱ्यांनी योजना पूर्ण नसल्यामुळे पाणी मिळत नाही. त्याची सोय करुन पाणी द्यावे, अशी मागणी केली. बैठकीत शेतकऱ्यांनी यापुढे पंपहाऊसमध्ये जाणार नाही, अशी हमी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने बंद असलेला पुणदी योजनेचा पाणी पुरवठा सुरू केला. (वार्ताहर)
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या - अविनाश पाटील
दुष्काळामुळे सर्वांचीच शेती वाया चालली आहे. शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या. लोढे, सिध्देवाडी तलावात पिण्याच्या पाणी योजना आहेत; मात्र पाण्याअभावी योजना ठप्प आहेत. या योजनेत सहभागी असणाऱ्या काही गावांनी पाणीपट्टी भरलेली नाही. अशा गावांकडून पाणीपट्टी वसूल करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, अशी मागणी बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी यावेळी केली.
...तर दीडपट पाणीपट्टी वसुली
पाणी योजनेचा सर्वाधिक लाभ घेऊनही काही शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाणीपट्टी भरली जात नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी पाणी योजनेचा सर्व्हे करून पाणी योजनेचा लाभ घेऊनही पाणीपट्टी भरत नसल्याचे आढळून आल्यास, अशा शेतकऱ्यांकडून सक्तीने दीडपट पाणीपट्टी वसूल करण्यात येईल, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.