तब्बल वर्षानंतर गाईच्या दुधास अच्छे दिन- अनुदानाविना दर : प्रतिलिटर दूध २५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:37 PM2019-06-08T18:37:49+5:302019-06-08T18:41:21+5:30
‘ना नफा... निव्वळ तोटा’ या तत्त्वावर गेल्या वर्षभरापासून तग धरून थांबलेल्या दूध उत्पादकांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. १ जूनपासून सर्व दूध संघांनी गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर निश्चित केला आहे.
अतुल जाधव
देवराष्ट्रे : ‘ना नफा... निव्वळ तोटा’ या तत्त्वावर गेल्या वर्षभरापासून तग धरून थांबलेल्या दूध उत्पादकांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. १ जूनपासून सर्व दूध संघांनी गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर निश्चित केला आहे. हा दर शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय शेतकऱ्यांना मिळणार असल्याने एक वर्षानंतर गाय दूध उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.
पाऊस कमी झाल्याने यावर्षी शेती उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध व्यवसायाने तारले होते; पण गेल्या वर्षभरापासून दूध दर पडल्याने शेतीला जोडधंदा असणाºया दूध व्यवसायाला व उत्पादन करणाºया शेतकºयांना तोटा सहन करावा लागला होता. दूध धवलक्रांतीचे अर्थकारण बिघडून ऐन उन्हाळ्यात शेतकºयांची होरपळ होत होती. तेव्हा म्हैस व गाईच्या दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत ११ मे पासून दूधदरात वाढ केली होती.
गाय दूधदरात प्रतिलिटर एक रुपयांनी, तर म्हैस दूधदरात प्रतिलिटर १.३० रुपयांची वाढ केली होती. तेव्हापासून दुधाचे अर्थकारण सुधारत चालले आहे. आता गाय उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ दर मिळणार आहे. ही दरवाढ १ जूनपासूनच्या दूध बिलाबरोबर मिळणार आहे. तसेच एसएनएफमधील फरकही कमी केल्याने प्रतिलिटर ६० पैसे फरक जादा मिळणार आहे, म्हणजेच उत्पादकांना नवीन दरवाढ २.६० रुपयांची मिळणार आहे.
शेतकºयांना आधार
दुष्काळाने चाºयाबरोबर पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सरकी, गोळी पेंडीचा सरासरी दर २५ ते ३० रुपये किलो झाला आहे. बाजारात पशुखाद्यात असणारी तेजी, गुरांचे आजारपण, वातावरणाचा होणारा परिणाम आदी कारणांमुळे उत्पादक अडचणीत सापडला होता; पण दूध दरात होत असलेली वाढ धवलक्रांती वाचविण्यासाठी व दूध उत्पादकांसाठी तारक ठरणार आहे.
अनुदान मिळाले तर...
वाढलेल्या दूध दरात जर शासनाने ५ रुपये अनुदानाची भर घातली, तर गाय दूध दर ३० रुपयांपर्यंत जाईल व दूध उत्पादक वर्षभर झालेल्या तोट्यातून सावरेल व दूधदराचा उच्चांक नोंदवला जाईल.