राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रेखा’ साकारणाऱ्या तासगावच्या ‘माया’वर मायेची झालर; ‘लोकमत’च्या बातमीची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:35 PM2023-08-28T12:35:35+5:302023-08-28T13:04:04+5:30

माया पवारच्या आयुष्याची खडतर कहाणी ‘लोकमत’ने मांडल्यानंतर तिच्यासाठी नागपूरच्या संस्थेने मदतीचा हात पुढे केला

After Lokmat presented the tough story of the life of Tasgaon Maya Pawar who played the lead role in the National Award-winning short film Rekha Nagpur organization helped her | राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रेखा’ साकारणाऱ्या तासगावच्या ‘माया’वर मायेची झालर; ‘लोकमत’च्या बातमीची दखल

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रेखा’ साकारणाऱ्या तासगावच्या ‘माया’वर मायेची झालर; ‘लोकमत’च्या बातमीची दखल

googlenewsNext

तासगाव : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या ‘रेखा’ या लघुपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तासगावच्या माया पवारच्या आयुष्याची खडतर कहाणी ‘लोकमत’ने मांडल्यानंतर तिच्यासाठी नागपूरच्या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. ‘डोईवर छप्पर नसल्याची खंत नाही, पण मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटते’ अशी भावना माया पवारने मांडल्यानंतर नागपूरच्या सर्व सेवाभावी समितीने तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

प्रसिद्धीच्या झगमगाटात असूनदेखील माया आणि तिच्या कुटुंबाच्या पोटाची भ्रांत कायम आहे. याबाबत ‘लोकमत’मधून ‘राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय, पण राहायला घरच नाही’ या मथळ्याखाली महाराष्ट्रभर वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत, थेट नागपूरमधील सामाजिक संस्थेने मायाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. मायाशी बोलून तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

तासगाव तालुक्यातील पेडसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या शेखर रणखांबे यांनी ‘रेखा’ हा लघुपट बनवला. उपेक्षित समाजातील महिलांच्या आयुष्यातील सर्वांगीण स्वच्छतेचा संदेश या लघुपटातून दिला. ‘रेखा’ची प्रमुख भूमिका वास्तवदर्शी आयुष्यात भोगणाऱ्या पारधी समाजातील तासगाव येथील माया पवार या तरुणीने साकारली. या लघुपटाला नुकताच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला. यापूर्वीही अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत.

मात्र, या अभिनेत्रीला ना राहण्यासाठी हक्काचे घर, ना उदरनिर्वाहाचे साधन आहे. मायाच्या आयुष्यातील अंधकारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. या वृत्ताची दखल घेत, थेट नागपूरमधील सर्व सेवाभावी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून मायाचा संपर्क क्रमांक मिळविला आणी तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली.

महिन्याला चार हजारांची तरतूद

नागपूरच्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मायाला संपर्क केला. तिच्यासाठी घर बांधून देण्याविषयी चर्चा झाली, मात्र मायाने घराबाबतची मदत नाकारली. घरापेक्षा मुलांच्या शिक्षणाची चिंता असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्याला चार हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.

समितीकडून ‘लोकमत’ला धन्यवाद

नागपूरच्या सर्व सेवाभावी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची नावे जाहीर करण्यास नकार दिला, मात्र ‘लोकमत’ला त्यांनी धन्यवाद दिले. ते म्हणाले की, माया पवारच्या आयुष्याची परवड ‘लोकमत’च्या माध्यमातून वाचायला मिळाली. अभिनयाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला असला तरी तिच्या आयुष्याची फरपट काळीज हेलावणारी आहे. आम्ही तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Web Title: After Lokmat presented the tough story of the life of Tasgaon Maya Pawar who played the lead role in the National Award-winning short film Rekha Nagpur organization helped her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली