दीर्घ प्रतीक्षेनंतर मिरज पूर्व भागात रस्त्यांची दुरुस्ती सुरू
By admin | Published: January 19, 2015 11:34 PM2015-01-19T23:34:30+5:302015-01-20T00:55:14+5:30
वाहनधारकांमधून समाधान : खराब रस्त्यांचा वनवास संपणार--लोकमतचा प्रभाव
लिंगनूर : मिरज पूर्व भागात पाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वच रस्त्यांवर टप्प्यांच्या दुरुस्तीस सुरूवात झाली आहे. मिरज ते सलगरे मार्गावर सुरू झालेल्या रस्ता दुरुस्तीमुळे वाहनधारक व प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक रस्त्यांवर पूर्ण दुरुस्ती, मोठे पॅच व खड्डे भरण्याचे कामही वेगात सुरू आहे. मिरज पूर्व भागात सर्वाधिक तक्रार मिरज ते सलगरे या आंतरराज्य मार्गाची होती. या रस्त्याची मागील पाच वर्षात दुरवस्था झाली होती. याचा फटका वाहनधारक, चालक, प्रवासी, वाहतूकदारांनी सोसला आहे. अनेक प्रकारची आंदोलने, निवेदने यांनी मागील काही वर्षे गाजली आहेत. दरम्यानच्या काळात खराब रस्त्यांना वैतागून राज्य परिवहन मंडळानेही बससेवा बंद करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मिरज ते सलगरेदरम्यान टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, बेळंकी, सलगरे ही मुख्य गावे असून यापैकी प्रथम टप्प्यात एरंडोली ते शिपूरदरम्यान रस्ता दुरुस्ती सुरू झाली आहे. येथे वेगाने काम सुरू असून पॅचवर्कऐवजी पूर्ण रस्ता दुरुस्ती सुरू आहे. यापुढील टप्प्यात बेळंकी ते सलगरेसह मिरजपासून कवठेमहांकाळला जोडणाऱ्या कोंगनोळी हद्दीतील रेल्वे पुलापर्यंत रस्त्याची दुरूस्ती होणार आहे. पुढील दोन-तीन वर्षात भरीव निधीची तरतूद झाल्यास येथील रुंदीकरणही शक्य आहे.मिरज ते बेडग रस्ता रुंदीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यापुढील बेडग ते आरगदरम्यान हुल्लेगिरी फाटा, आरग विजापूर वेस, लिंगनूर ते आरग व लिंगनूर ते बेळंकी, जानराववाडी फाटा ते बेळंकी स्टॅँडपर्यंत रस्ता दुरुस्ती व पॅचवर्क होणार आहे. लिंगनूर ते खटावदरम्यानही रस्ता दुरुस्ती होणार आहे. (वार्ताहर)
चर्चा ‘लोकमत’ची
मिरज पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची सर्व स्तरातून दखल घेतली गेली आहे. सध्या सुरू झालेल्या दुरुस्तीमुळे ‘लोकमत’मधील बातम्यांची चर्चा होत असून, त्याचाच प्रभाव असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.