प्रांतांच्या नोटिसीनंतर रस्ते दुरूस्ती सुरू
By admin | Published: December 15, 2014 10:39 PM2014-12-15T22:39:03+5:302014-12-16T00:03:12+5:30
मिरज-कवठेमहांकाळ रस्ता : बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना फौजदारी कारवाईची नोटीस
मिरज : मिरज ते कवठेमहांकाळ तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल मिरजेचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिरज व मिरज पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या नोटिसीमुळे बांधकाम विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाली असून, मिरज ते कवठेमहांकाळ रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरात रस्ते दुरूस्ती झाली नसल्याने रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मिरज व मिरज पश्चिम बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार धरून कारवाईची नोटीस दिली आहे. मिरज पूर्व भागातील व कवठेमहांकाळ तालुक्यातील रस्ते मोठ्याप्रमाणात खराब झाले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत असतानाही याकडे आपल्याकडून दुर्लक्ष होते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपल्या ताब्यात असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना केली नाही, तर अपघातांच्या दुर्घटनेस जबाबदार धरून उपविभागीय दंडाधिकारी म्हणून आपल्याविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.
नोटिसीमुळे बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन त्यांनी रस्ते दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. मिरज ते कवठेमहांकाळ तालुक्यात काही ठिकाणी खड्डे भरण्याचे व पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्रांताधिकाऱ्यांनी यापूर्वी कारवाईची नोटीस दिल्याने मिरज ते शिरढोणदरम्यान महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. (वार्ताहर)
अधिकारी खडबडून जागे
नोटिसीमुळे बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन त्यांनी रस्ते दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
मिरज ते कवठेमहांकाळ तालुक्यात काही ठिकाणी खड्डे भरण्याचे व पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसा बजाविल्या आहेत.
मिरज तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या खड्ड्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.