सरपंच निवडीनंतर तासगाव तालुक्यात वर्चस्वासाठी रस्सीखेच

By admin | Published: November 19, 2015 12:31 AM2015-11-19T00:31:42+5:302015-11-19T00:38:26+5:30

नेते सरसावले : ३९ पैकी राष्ट्रवादीचा २५ जागांवर, तर भाजपचा २२ ग्रामपंचायतींवर दावा; संघर्ष पेटणार

After the selection of the sarpanch, Tasgaon taluka has got a rope to win | सरपंच निवडीनंतर तासगाव तालुक्यात वर्चस्वासाठी रस्सीखेच

सरपंच निवडीनंतर तासगाव तालुक्यात वर्चस्वासाठी रस्सीखेच

Next

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी बुधवारी पूर्ण झाल्या. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सुरू असलेली भाजप आणि राष्ट्रवादीतील वर्चस्वाची रस्सीखेच या निवडीवेळीही प्रकर्षाने दिसून आली. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर राष्ट्रवादीने २५ ग्रामपंचायतींवर, तर भाजपने २२ ग्रामपंचायतींचे सरपंच आमच्या गटाचे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमके सरपंच कोणत्या गटाचे? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मोठ्या अटीतटीने पार पडल्या. निकालानंतर अनेक गावांत सत्तांतर झाले. बहुतांश निवडणुका आबा आणि काका गटात झाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून बहुतांश ग्रामपंचातींवर आमचीच सत्ता असल्याचा दावा केला जाता होता.
त्याचीच पुनरावृत्ती सरपंच, उपसरपंच निवडीतही पाहायला मिळाली. आपल्याच गटाचा सरंपच व्हावा, यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र एकाही गावात सदस्यांची फाटाफूट झाली नाही. मात्र निवडीनंतर दोन्ही नेत्यांनी पुन्हा वर्चस्वाचा दावा केला. काही ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच आमच्याच गटाचा असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे.
त्यामुळे हे सरंपच, उपसरपंच कोणत्या गटाचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर काही पदाधिकाऱ्यांनी आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील या दोन्ही नेत्यांकडे हजेरी लावल्याने संभ्रम वाढला आहे.
भाजपने काही सरपंचांचा सत्कार घेत दावा केला, तर राष्ट्रवादीने समर्थक सरपंच आणि उपसरपंचांना एकत्रित करून सत्कार केला, असे असले तरी भाजप आणि राष्ट्रवादीतील वर्चस्वाची लढाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यातून पुन्हा संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. (वार्ताहर)
राष्ट्रवादीचा या गावांवर दावा
कवठेएकंद, मांजर्डे, बोरगाव, सिंध्देवाडी, तुरची, विसापूर, पेड, निंंबळक, धामणी, धुळगाव, हातनूर, कौलगे, विजयनगर, नरसेवाडी, नागाव कवठे, मांजर्डे, लोढे, दहीवडी, गव्हाण, लोकरेवाडी, यमगरवाडी, वज्रचौंडे, जुळेवाडी, गौरगाव, डोर्ली.
भाजपचा या ठिकाणी दावा
शिरगाव, जुळेवाडी, आळते, निंबळक, ढवळी, धामणी, हातनोली, राजापूर, येळावी, गोटेवाडी, पाडळी, मोराळे, विजयनगर, धोंडेवाडी, नरसेवाडी, डोर्ली, लोढे, जरंडी, वडगाव, सावळज, वाघापूर, गौरगाव.
 

विरोधकांनी सत्तेच्या जोरावर सुरू केलेल्या दहशत आणि दडपशाहीला चोख उत्तर देऊन आर. आर. आबांच्या विचारांशी बांधिलकी कायम ठेवली आहे. तालुक्यातील अनेक गावांत उमेदवारांना वेठीस धरून नेतृत्व मान्य करण्यासाठी दबाव आणला. मात्र सर्व पर्याय वापरूनही खासदारांचे तालुक्यातील जनतेने पाणीपत केले आहे.
- आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी
 

तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींत भाजपचे सरपंच आणि उपसरपंच झाले आहेत, तर एका ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता असून, भाजपचा उपसरपंच आहे. सावळजमध्ये जनतेने भाजपच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून परिवर्तन केले. पहिल्यांदाच या ठिकाणी सरपंच, उपसरपंच निवडीनंतर भाजपचा झेंडा फडकला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविला जाईल.
- खासदार संजयकाका पाटील, भाजप.

Web Title: After the selection of the sarpanch, Tasgaon taluka has got a rope to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.