Women's Day Special: पतीच्या निधनानंतर जिद्दीने सांभाळला व्यवसाय, चिंचणीच्या सुलभा माने यांची संघर्षगाथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:53 IST2025-03-08T18:53:09+5:302025-03-08T18:53:09+5:30
सोने-चांदी परीक्षण (टंच) व्यवसाय आणि शेतीही यशस्वीपणे पुढे नेली, पुण्यात ‘त्रिशूल असेअर्स’ची उभारणी

Women's Day Special: पतीच्या निधनानंतर जिद्दीने सांभाळला व्यवसाय, चिंचणीच्या सुलभा माने यांची संघर्षगाथा
प्रताप महाडीक
कडेगाव : जीवन अनपेक्षित वळण घेते; पण धैर्य, जिद्द आणि प्रयत्न याच्या जोरावर अडचणींवर मात करता येते, याचा प्रत्यय चिंचणी (ता. कडेगाव) येथील सुलभा सुरेश माने यांच्या संघर्षातून येतो. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी केवळ कुटुंबाची जबाबदारीच उचलली नाही, तर सोने-चांदी परीक्षण (टंच) व्यवसाय आणि शेती यालाही यशस्वीपणे पुढे नेले.
सुलभा माने यांचे पती सुरेश माने आणि दीर विकास माने यांनी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून सोने-चांदी गलाई व्यवसाय शिकण्यासाठी १९८८ मध्ये मद्रासला (तमिळनाडू) प्रयाण केले. त्यानंतर काही वर्षांनी पुण्यात ‘त्रिशूल असेअर्स’ नावाने टंच व्यवसाय सुरू केला. व्यवसायाला यश मिळाले; पण २००३ मध्ये विकास माने यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सुरेश माने यांनी खांद्यावर घेतली.
२०१० मध्ये सुरेश माने यांच्या किडनीच्या गंभीर आजाराने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या उपचारासाठी सुलभा माने यांच्या आईने स्वतःची किडनी दान केली. या कठीण काळातही सुरेश माने यांनी व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्या निधनानंतर सुलभा माने यांच्यासमोर कुटुंबाची आणि व्यवसायाची जबाबदारी उभी राहिली. सुलभा माने यांनी हताश न होता व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. स्वतः शिकत त्यांनी व्यवसाय चालू ठेवला. आज पुण्यातील विश्वासार्ह टंच व्यावसायिकांत त्यांची गणना होते. गावातील प्रत्येक सामाजिक कामात त्या मोलाचा वाटा उचलतात.
शेतीतही आधुनिक प्रयोग
व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी आपल्या गावातील कोरडवाहू शेती बागायतीमध्ये बदलली. ताकारी योजनेचे पाणी मिळाल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवले. त्यांनी पुतणी आणि मुलांच्या शिक्षणाची व जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. पुतणीने बी. फार्म पूर्ण केले, तर दोन्ही जुळी मुले दहावीत शिकत आहेत. त्यांनी या मुलांना आदर्श संस्कार दिले आहेत.
महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण
अनेकदा पतीच्या निधनानंतर महिला निराश होतात; पण सुलभा माने यांनी परिस्थितीशी झुंज देत कुटुंब आणि व्यवसाय दोन्ही सांभाळले. त्यांची ही संघर्षगाथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही, हा त्यांचा संदेश अनेक महिलांना नव्या ऊर्जेने उभे राहण्याची प्रेरणा देतो.