वडिलांनंतर मुलानेही कोरले ‘भारत श्री’वर नाव; सांगलीच्या प्रथमेशला मिस्टर युनिव्हर्समध्ये कास्य, भारत श्री'मध्ये सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:36 PM2023-11-04T14:36:16+5:302023-11-04T15:29:14+5:30

१९ व्या वर्षीच त्याने मोठे यश मिळवले

After the father the son also carved the name on Bharat Shri; Sangli Prathamesh Aarte won bronze in Mr. Universe, gold in Mr. India | वडिलांनंतर मुलानेही कोरले ‘भारत श्री’वर नाव; सांगलीच्या प्रथमेशला मिस्टर युनिव्हर्समध्ये कास्य, भारत श्री'मध्ये सुवर्ण

वडिलांनंतर मुलानेही कोरले ‘भारत श्री’वर नाव; सांगलीच्या प्रथमेशला मिस्टर युनिव्हर्समध्ये कास्य, भारत श्री'मध्ये सुवर्ण

सांगली : वडिलांनी १९९४ मध्ये ‘भारत श्री’ आणि ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरले. तब्बल ३० वर्षानंतर मुलाने वडिलांच्या एक पाऊल पुढे टाकत मिस्टर युनिव्हर्समध्ये कास्यपदक आणि भारत श्री मध्ये सुवर्णपदक मिळवले. यामुळे एकाच घरात दोन भारत श्री बनण्याचा अनोखा विक्रमही नोंदवला गेला. भारत श्री बनलेल्या प्रथमेश आरते याची सांगलीत जंगी मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.

तब्बल ३० वर्षापूर्वी रवींद्र आरते यांची पिळदार शरीरयष्टी पाहून अनेक जण या क्षेत्राकडे वळले. तरुण भारत स्टेडियमवर त्यांची तब्येत पाहण्यासाठी अनेक जण यायचे. त्यानंतर व्यायाम करण्याचा निश्चय करायचे. रवींद्र यांनी देश व राज्य पातळीवरील दोन मानाच्या किताबाबरोबर अनेक स्पर्धांतून यश मिळवले.

मुलगा प्रथमेश यानेही नाव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती. प्रथमेशला शालेय जीवनात कबड्डीची आवड निर्माण झाली. तरुण भारत मंडळ व पटेल चौक मंडळाकडून कबड्डी खेळताना त्याने लौकिक मिळवला. कबड्डीच्या व्यायामामुळे त्याची तब्येत सुडौल होती. तशातच त्याला वडिलांप्रमाणे शरीरसौष्ठवची आवड निर्माण झाली. एक ते दीड वर्षातच त्याचे सुडौल शरीर पिळदार बनले.

छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मिस्टर युनिव्हर्स या वरिष्ठ गटातील स्पर्धेत २३ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. प्रथमेशने ५५ किलो गटात कास्यपदक पटकावले. त्याचबरोबर तिथेच झालेल्या भारत श्री ज्युनिअरमध्ये ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे आरते यांच्या कुटुंबात दोन भारत श्री बनल्याचा वेगळा विक्रम झाला. प्रथमेश याला वडील रवींद्र, प्रशिक्षक भगीरथ राठोड, छत्रपती पुरस्कारविजेते नामदेवराव मोहिते, हणमंत कुकडे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. १९ व्या वर्षीच त्याने मोठे यश मिळवले. सध्या तो जीए कॉलेजमध्ये बी.कॉम. भाग २ मध्ये शिकत आहे. सांगलीत जंगी मिरवणूक काढून त्याचे जल्लोषात स्वागत झाले. 

Web Title: After the father the son also carved the name on Bharat Shri; Sangli Prathamesh Aarte won bronze in Mr. Universe, gold in Mr. India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली