सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:34 AM2023-11-27T11:34:02+5:302023-11-27T12:06:14+5:30

ब्रेन डेड उद्योजकाच्या अवयवदानानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ने अवयव मुंबईला रवाना

After the organ donation of a brain dead entrepreneur in Sangli the organ was sent to Mumbai by Green Corridor | सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात!

सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात!

सांगली : सत्तर पोलिसांचा ताफा... सुरूवातीला पोलिसांची गाडी... त्यानंतर रूग्णवाहिका... हृदय घेऊन असलेली रुग्णवाहिका आणि नंतर पोलिसांची गाडी... अवघ्या ३४ मिनिटात कोल्हापुरात जात हृदय मुंबईला रवाना. मेंदूचे काम थांबल्याने येथील एका उद्योजकाच्या अवयवदानाचा निर्णय कुटुंबीयांनी घेत त्याला पोलिस प्रशासनाने साथ दिली. ‘ग्रीन कॉरिडॉर’ने हृदय कोल्हापुरातून खास विमानाने मुंबईला तर इतर अवयव रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठविण्यात आले.

येथील उष:काल रुग्णालयात येथील उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी (वय ४५) यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ब्रेन डेड झाल्याने रुग्णालयाने कुटुंबीयांना विश्वासात घेत अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. कुटुंबीयांनीही तो मान्य केल्यानंतर याबाबतची तयारी करण्यात आली. सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते पुणे या दोन मार्गांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या मोदानी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे व ब्रेन डेड असल्याने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण वर्षभरापासून कृत्रिम श्वासावर असून, त्यांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालयाकडे होती. त्यानुसार तिथे संपर्क साधत पुढील प्रक्रिया करण्यात आली.

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलिस प्रशासनाला आदेश दिल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ची तयारी करण्यात आली. हृदय ठराविक वेळेत मुंबईत पोहोचणे आवश्यक असल्याने कोल्हापूरच्या विमानतळावरून खासगी विमानाने ते पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी टीम तयार करत रविवारी दुपारी पावणेदोन वाजता हृदय कोल्हापूरसाठी नेण्यात आले.

कोल्हापूर मार्गावर सुरूवातीला पोलिस गाडी, मध्यभागी रुग्णवाहिका आणि त्यानंतर हृदय ठेवलेली रुग्णवाहिका, शेवटी पोलिस गाडी असा निघालेला ताफा ३४ मिनिटांत कोल्हापूर विमानतळावर पोहोचला. त्यानंतर काही वेळातच विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रियाही मुंबईत सुरू करण्यात आली.

इतर अवयव अडीच तासात पुण्यात

दुसरीकडे अन्य अवयव पुण्यासाठी रवाना झाले. मिरज येथील वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांनी त्यासाठी नियोजन केले. अवघ्या अडीच तासांत अवयव घेऊन हा ताफा पुण्यात दाखल झाला. पुण्यात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना याचे प्रत्यारोपण केले जाणार आहे. तर सांगलीतील दोन रुग्णांसाठी नेत्र उपयोगात येणार आहेत.

Web Title: After the organ donation of a brain dead entrepreneur in Sangli the organ was sent to Mumbai by Green Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.