तीन महिन्यांनंतर म्हैसाळ योजना झाली सुरू
By admin | Published: November 7, 2014 10:44 PM2014-11-07T22:44:20+5:302014-11-07T23:34:15+5:30
सुटकेचा नि:श्वास : थकित वीज बिल, तांत्रिक अडचणींसाठी योजना बंद
कवठेमहांकाळ : गेले तीन महिने तांत्रिक अडचणी, थकित वीज बिल अशा विविध कारणांनी अडलेले म्हैसाळ योजनेचे पाणी आजपासून सुरू करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू झाल्याने मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
निवडणुकीच्या आधी म्हैसाळ योजनेसह इतर योजनेची थकित वीज बिले टंचाई निधीतून भरण्यात यावीत असा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला होता. परंतु अद्याप ही वीज बिले टंचाई निधीतून न भरल्याने महावितरण म्हैसाळ योजनेसाठी विद्युत पुरवठा करण्यास तयार नव्हते. अखेर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रशासनाला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले व निवडणुकीपूर्वी टंचाई निधीतून वीज बिल भरण्याचा घेण्यात आलेला निर्णय तातडीने अंमलात आणावा व म्हैसाळ योजनेचे थकित वीज बिल तातडीने टंचाई निधीतून भरण्यात यावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुशवाह यांनीही त्याला ग्रीन सिग्नल दाखवित वीज बिल भरण्याचा निर्णय मान्य केला आणि महावितरणलाही तसे कळविले. त्यानंतर म्हैसाळ योजनेचे अडलेले पाणी अखेर आजपासून सुरू झाले.
आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांकडून अवाजवी पाणीपट्टी वसूल करू नये अशाही सूचना केल्या. ऊस, डाळिंब आणि द्राक्षबागेसाठी एकरी अडीच हजार रुपयेप्रमाणे पाणीपट्टी आकारावी, तसेच ज्वारीसाठी एकरी पाचशे पाणीपट्टी आकारावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांनीही म्हैसाळ योजना अवितरपणे चालू राहण्यासाठी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
म्हैसाळ योजनेच्या पाण्याने दुष्काळी पट्ट्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत. तलाव भरल्याने पाणी टंचाईच्या काळात त्याचा शेतीसाठी उपयोगात आणता येईल आणि पाण्यासाठी तारांबळ उडणार नाही, अशाही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आता म्हैसाळ योजना उन्हाळ्यापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
गेले तीन महिने म्हैसाळ योजना तांत्रिक अडचणी, थकित वीज बिल, थकित पाणीपट्टी यामुळे बंद होती. ऐन रब्बी हंगाम सुरू असताना म्हैसाळ योजना बंद होती. गेले १५ दिवस माजी गृहमंत्री आर. आर. पाटील म्हैसाळ योजनेच्या अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. त्यांना पाणी सोडण्यासाठी सूचना करीत होते. परंतु प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत होते.