Maratha Reservation: गावबंदीनंतर आता सांगली शहरात वार्डबंदी
By शीतल पाटील | Published: October 31, 2023 06:26 PM2023-10-31T18:26:07+5:302023-10-31T18:26:57+5:30
सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीला सांगली जिल्ह्यातही जोर वाढला आहे. जिल्ह्यातील विविध गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. ...
सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीला सांगली जिल्ह्यातही जोर वाढला आहे. जिल्ह्यातील विविध गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. आता शहरातही राजकीय नेत्यांना वार्डबंदी करण्यात आली. कोल्हापूर रोड परिसरातील शामरावनगर वार्डात मराठा समाजाच्यावतीने वार्डबंदीचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. कर्नाळ, बेडग,कसबेडिग्रज, मालगावसह जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. गावागावात उपोषण आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा शहरातही पसरू लागला आहे. कोल्हापूर रोडवरील शामरावनगरमधील प्रभाग १८ मधील मराठा बांधवांनी एकत्र येत वार्डबंदीचा निर्णय घेतला आहे.
प्रभाग १८ मध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मंगळवारी राजकीय नेते मराठा आरक्षणाला साथ देत नसल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनेही केली. मराठा आरक्षणाबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. मनोज जरंगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. काही दगा फटका झाल्यास शासन जबाबदार राहील. मराठा समाज दिवाळी सण साजरा करणार नाही. तरी लवकर विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी शैलेश पवार, स्वराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष महादेव साळुंखे, पंडित पाटील, संभाजी पोळ, बाळासाहेब जगदाळे, अण्णासाहेब थोरात, दत्तराज मेंगाणे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.