सीसीटीव्ही पाहिल्यावर कळले, दुकानातून दागिने पळवले!, सांगलीतील जतमधील घटना
By श्रीनिवास नागे | Published: June 23, 2023 05:07 PM2023-06-23T17:07:40+5:302023-06-23T17:08:19+5:30
जत शहरातील मंगळवार पेठेत चोरट्यांचा सुळसुळाट
जत : जत शहरातील सराफी दुकानातून सोने घेण्याचा बहाणा करून दोन महिलांनी सव्वालाखाचे गंठण लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आता. त्यानंतर दुकानाचे मालक प्रकाश शिवाप्पा बंडगर यांनी शुक्रवारी जत पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अनोळखी दोन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा चोरीच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळी बंडगर यांच्या सराफी दुकानात सोने घेण्याच्या उद्देशाने दोन अनोळखी महिला आल्या. यावेळी दुकानात गर्दी होती. या गर्दीचा फायदा उचलत संशयित दोन महिलांनी सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र, दुकानात गर्दी असल्याने बंडगर यांना चोरी झाल्याचे लक्षात आले नाही. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सीटीटीव्ही फुटेज पाहत असताना बंडगर यांना महिलांनी चोरी केल्याचा प्रकार आढळून आला. यानंतर त्यांनी या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात केली.
जत शहरातील मंगळवार पेठेत चोरट्यांचा सुळसुळाट आहे. दररोज चोरीचे प्रकार घडत आहेत. परंतु संबंधित व्यक्ती पोलिस ठाण्याकडे तक्रार देण्यास सहसा धजावत नाहीत.